विरार -अलिबाग मल्टी कॉरिडॉर प्रकल्पाला गती

Virar and Alibaug corridor

मुंबई – मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशमधील (Mumbai Metropolitan Region Development Authority )वाहतूककोंडी कमी करण्यासाठी विरार-अलिबाग (Virar and Alibaug corridor)मल्टी कॉरिडॉर प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे त्याचबरोबर या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २२ हजार २५० कोटींच्या कर्जाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे.

या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हुडको या वित्तीय संस्थेकडून उभारण्यात येणाऱ्या २२ हजार २५० कोटीच्या कर्जाला शासन हमी देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने २६ जून २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मंजूरी दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मागणीनुसार हुडकोकडून प्रस्तावित व्याजाचा दर कर्ज घेण्याच्या वास्तविक तारखेवर अवलंबून असणार आहे. कर्ज घेताना रिझर्व्ह बँकेच्या प्रचलित बँक दराचा विचार करून, त्यानुसार व्याजाचा दर कमीत कमी निश्चित करण्याबाबतची कार्यवाही व्हावी. कर्जाचा मुदत कालावधी १५ वर्षांचा असावा. विधी व न्याय विभागाने विहित केलेल्या नमुन्यात शासन हमी करारनामा करण्यात यावा, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या आर्थिक स्थितीचा अहवाल दर ६ महिन्यांनी (३१ मार्च व ३० सप्टेंबर) सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करणे बंधनकारक असणार आहे.