Sahitya Sammelan – Vishwas Patil : प्रसिद्ध लेखक व ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर हे संमेलन होणार आहे. ही निवड एकमताने झाली असून, त्यामुळे संमेलनाध्यक्षपदाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
सातारा येथे होणाऱ्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपतकार’ विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली, याचा मला अतिशय आनंद आहे, त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणून त्यांनी सरकारमध्ये सुद्धा अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. पण त्यापेक्षा त्यांची…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2025
एकमताने झाली निवड
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे आणि बाळ फोंडके यांची नावेही चर्चेत होती. मात्र, भालचंद्र नेमाडे यांनी यापूर्वीच नकार दिल्याने विश्वास पाटील यांचे नाव आघाडीवर होते.
साहित्य महामंडळाच्या विविध घटक आणि संलग्न संस्थांनी एकमताने पाटील यांच्या नावाची शिफारस केल्याने बैठकीत मतदान घेण्याची वेळ आली नाही. या बैठकीनंतर महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन विश्वास पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
या संमेलनाचे व्यासपीठ राजकीय नसेल आणि वेगवेगळ्या दिवशी नेतेमंडळींना निमंत्रित केले जाईल, असेही जोशी यांनी स्पष्ट केले.
संमेलनाचे वैशिष्ट्य आणि ऐतिहासिक स्थळ
या वर्षीच्या संमेलनाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे, प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सर्व पूर्वाध्यक्ष, सरस्वती सन्मान प्राप्त लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते निवडक लेखक आणि साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षांना निमंत्रित केले जाणार आहे. संमेलनाच्या उद्घाटनाच्या आदल्या दिवशी ग्रंथदिंडी निघणार असून त्याच दिवशी कविकट्टा, ग्रंथ प्रदर्शन आणि बालकुमारांसाठी आनंद मेळाव्याचे उद्घाटन होईल.
संमेलनात वक्त्यांच्या भाषणांपेक्षा चर्चेतून विषयांना न्याय देण्यावर भर असेल. निमंत्रितांचे कवी संमेलन, गाजलेल्या पुस्तकांवर चर्चा, लेखकांच्या मुलाखती असे विविध दर्जेदार कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर होणारे हे संमेलन शहराच्या मध्यभागी असून ते बस स्थानकापासून अगदी पायी चालत जाण्यासारख्या अंतरावर आहे. हे स्टेडियम 14 एकर परिसरात असून तिथे मुख्य मंडप, इतर मंडप आणि विविध दालनांची व्यवस्था केली जाणार आहे. स्टेडियममध्ये 25,000 प्रेक्षकांची क्षमता असलेली गॅलरी आहे.
साताऱ्यात यापूर्वी 1905, 1962 आणि 1993 साली साहित्य संमेलन झाले होते. विशेष म्हणजे 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली झालेले 66 वे संमेलन याच स्टेडियममध्ये पार पडले होते.
विश्वास पाटील यांची साहित्य संपदा
विश्वास पाटील हे त्यांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील कादंबऱ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. ‘पानिपत’ ही त्यांची सर्वाधिक गाजलेली कादंबरी आहे. त्यांच्या ‘झाडाझडती’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या प्रमुख साहित्यकृतींमध्ये ‘संभाजी’, ‘गाभूळलेल्या चंद्रबनात’, ‘नागकेशर’, ‘पांगिरा’, ‘चंद्रमुखी’, ‘क्रांतिसूर्य’, ‘महानायक’, ‘महासम्राट’, ‘बंदा रुपाया’ यांसारख्या अनेक प्रभावी कादंबऱ्यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा – Devendra Fadnavis : कुणबी प्रमाणपत्र नेमके कोणाला मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले