Sambhaji Raje Chhatrapati | दुर्गराज रायगडावर (Raigad Fort) सुरू असलेल्या उत्खननात एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खननात ‘यंत्रराज’ (Yantraraj) म्हणजेच सौम्ययंत्र (Astrolabe) नावाचे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण आढळून आले आहे.
रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली असून, या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात तत्कालीन प्रगत आणि वैज्ञानिक पद्धतींचा वापर झाल्याचे संकेत मिळत आहेत.
संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, खगोलशास्त्रीय अभ्यास करून रायगडाचे बांधकाम तत्कालीन अत्याधुनिक पद्धतीने झाले होते, याचा हा महत्त्वाचा पुरावा आहे. ‘यंत्रराज’ हे उपकरण प्राचीन काळापासून ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी, दिशा शोधण्यासाठी आणि वेळ मोजण्यासाठी वापरले जात असे. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त आणि विषुववृत्त यांसारख्या खगोलीय गोष्टींचा अभ्यास करणे या यंत्रामुळे सोपे होत असे. रायगडाचे बांधकाम करताना खगोलशास्त्रीय गणनांसाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
गेल्या ३ ते ४ वर्षांपासून रायगडावर विविध ठिकाणी उत्खनन सुरू आहे. यात रोपवे अप्पर स्टेशनच्या मागील बाजू, कुशावर्त तलाव , बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर आणि वाडेश्वर मंदिर परिसरातील शिवकालीन वाड्यांच्या अवशेषांचा समावेश आहे. कुशावर्त तलावाच्या वरील भागात आणि पर्जन्यमापक ते वाडेश्वर मंदिरादरम्यानच्या ऐतिहासिक वाड्याच्या जागेवर हे ‘यंत्रराज’ सापडले आहे.
या ‘यंत्रराज’ उपकरणावर काही अक्षरे कोरलेली आहेत. मध्यभागी कासव किंवा सापासारख्या दोन प्राण्यांचे अंकन आहे. त्यांचे मुख आणि शेपटी कोणत्या दिशेला असावी, हे समजण्यासाठी उपकरणाच्या वरच्या बाजूला ‘मुख’ आणि ‘पूंछ’ असे शब्द कोरलेले आहेत. यावरून उत्तर आणि दक्षिण दिशा ओळखणे सोपे होत असावे, असा अंदाज आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले की, या अमूल्य शोधाने इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या यंत्राच्या अधिक अभ्यासातून रायगडाच्या बांधकामातील तत्कालीन खगोलशास्त्रीय ज्ञान आणि तंत्रज्ञानावर प्रकाश पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.