बीड- भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसरी कन्या यशश्री मुंडे यांनीही आता राजकारणात प्रवेश केला आहे. बीडमधील परळी येथील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर आजपर्यंत या बँकेत सध्या राज्यात कॅबिनेट मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ निर्विवादपणे निवडून येत आहे. यशश्री यांच्यासोबत गोपीनाथ मुंडे यांच्या दुसर्या कन्या माजी खासदार प्रीतम यांनीही अर्ज भरला आहे.
यशश्री पेशाने वकील आहेत. त्यांनी अमेरिकेत उच्चशिक्षण घेतले असून काही वर्षांपूर्वी त्यांना अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट म्हणून गौरवण्यात आले. यशश्री यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांनी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागले आहे. दरम्यान, शेवटच्या दिवशी ७१ अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक अर्जांची छाननी १४ जुलै रोजी होणार आहे. तर १५ ते २९ जुलैदरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून, यानंतर निवडणुकीचे उमेदवार घोषित होणार आहेत. एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होत असून १० ऑगस्ट रोजी मतदान आणि १२ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यावेळीदेखील एकत्र दिसतील. यापूर्वी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुकही दोघांनी मिळून बिनविरोध केली होती.