Zeeshan Siddique | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) यांना गेल्या दोन दिवसांत त्यांच्या ईमेल आयडीवरून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आता वांद्रे पोलिस तपास करत आहेतपोलिसांनी झिशान सिद्दिकी यांचा जबाब नोंदवायला सुरुवात केली असून त्यानंतर एफआयआर दाखल केला जाणार आहे, अशी माहिती झोन ९ चे पोलीस उपायुक्त नितीन गोयल यांनी दिली.
झिशान सिद्दिकी यांच्या वडील, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची१२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे पूर्व येथे त्यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात प्रमुख मारेकरी शिवकुमार गौतमला एक महिन्यानंतर अटक झाली, परंतु अझूनही झीशान अख्तर आणि शुभम लोणकर हे दोन सूत्रधार फरार आहेत.
डी कंपनीच्या नावाने धमकी; १० कोटींच्या खंडणीची मागणी
प्राथमिक तपासानुसार, झिशान सिद्दिकी यांच्या Gmail अकाउंटवर तीन ईमेल आले असून, त्यात धमकी देणाऱ्याने स्वतःला दाऊद इब्राहिमच्या टोळीचा (D-Company) सदस्य असल्याचा दावा केला आहे. या ईमेलमध्ये “तुझी अवस्था तुझ्या वडिलांसारखीच करू,” अशी थेट धमकी देण्यात आली असून, संरक्षणाच्या मोबदल्यात 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.
१९ एप्रिल रोजी मिळालेल्या एका मेलमध्ये बंदूक आणि दोन गोळ्यांचे चित्र होते आणि त्यात स्पष्टपणे लिहिले होते – “बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई आहे अशी बनावट बातमी पसरवली गेली, पण ती चुकीची आहे. आता मी तुमच्या कुटुंबाकडून ₹10 कोटी मागतोय. दोन दिवसांत पैसे द्या.”
तसेच, “पोलिसांना माहिती देऊ नका, नाहीतर तुझ्यावर हल्ला होऊ शकतो. ईमेलचा उत्तर देऊन तुझी खात्री कळव. डी कंपनी.” अशीही धमकी मेलमध्ये देण्यात आली.
पोलीस संरक्षणात वाढ; गुन्हा दाखल करण्याची तयारी
झिशान सिद्दिकी यांनी या धमक्यांकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं, परंतु मेलमधून सतत आठवण दिली जात असल्याने अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. सध्या त्याच्या राहत्या घरी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांचे गुन्हे शाखेचे एक पथकही या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करत आहे. झिशान सिद्दिकी यांनी पोलिसांकडे आपल्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे.