Abir Gulaal Movie | काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या (Pahalgam Terror Attack) पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील लोकप्रिय अभिनेता फवाद खान (Fawad Khan) याचा हिंदी चित्रपट ‘अबीर गुलाल’ (Abir Gulaal) भारतात प्रदर्शित होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
आरती एस. बागडी दिग्दर्शित आणि अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
“पाकिस्तानी कलाकार सहभागी असलेल्या या चित्रपटाला भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शनाची परवानगी दिली जाणार नाही.”, असे सांगितले जात आहे. याबाबत हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिले आहे.
एप्रिल 23 रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जण ठार झाले, त्यात बहुतांश पर्यटक होते. यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने पाकिस्तानी कलाकारांवर आधीपासून असलेल्या बंदीचा पुनरुच्चार करत, ‘अबीर गुलाल’ आणि फवाद खानविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी भारतीय चित्रसृष्टीत पाकिस्तानी कलाकार, गायक व तंत्रज्ञांना सहभागी करू नये, असे ठाम मत व्यक्त केले.
FWICE च्या निवेदनानुसार, “सध्याच्या परिस्थितीत आम्ही पुन्हा एकदा भारतीय प्रकल्पांमध्ये पाकिस्तानी कलाकारांवरील पूर्ण बहिष्काराची भूमिका घेत आहोत. हाच निर्णय 2019मध्ये पुलवामा हल्ल्यानंतरही घेतला गेला होता.”
‘ऐ दिल है मुश्किल’ (2016) नंतर फवाद खानला भारतात काम करण्यास विरोध झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळीही, त्याने बुधवारी रात्री आपल्या इंस्टाग्रामवर पहलगाम हल्ल्याचा निषेध करत, “या अमानुष घटनेमुळे व्यथित आहे. पीडितांसाठी संवेदना व प्रार्थना,” असे लिहिले. वाणी कपूरनेही आपल्या इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत या घटनेचा निषेध केला आहे.
दम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही ‘अबीर गुलाल’ च्या प्रदर्शनाला तीव्र विरोध केला होता.
‘अबीर गुलाल’ ची निर्मिती इंडियन स्टोरीज प्रोडक्शन, अ रिचर लेन्स आणि आरजे पिक्चर्स यांनी केली असून, निर्मात्यांमध्ये विवेक बी अग्रवाल, अवंतिका हरी आणि राकेश सिप्पी यांचा समावेश आहे. चित्रपटात लिसा हेडन, रिद्धी डोगरा, फरीदा जलाल, सोनी राझदान आणि परमीत सेठी यांच्या भूमिका आहेत.