Anurag Kashyap controversy | चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ब्राह्मण समाजाबद्दल (Brahmin controversy) आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे इंदोरच्या एमजी रोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अनूप शुक्ला नावाच्या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती दिली आहे.
या प्रकरणात परशुराम सेनेचा (Parshuram Sena protest) तीव्र संताप पाहायला मिळाला. त्यांनी घोषणाबाजी करत कश्यपचा पुतळा उचलून खान नदीत फेकला. इतकंच नाही, तर जर तो इंदोरमध्ये आला तर त्याचं तोंड काळं करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
इंस्टाग्रामवरून वादाची ठिणगी
या सर्व घडामोडींचा एका इंस्टाग्राम कमेंटमधून सुरुवात झाली . एका युजरने कश्यपला उद्देशून ब्राह्मण समाजावर भाष्य केलं, त्यावर उत्तर देताना त्याने लिहिलं, “ब्राह्मण पर मैं मूतूंगा… कोई प्रॉब्लम?” याच वाक्यावरून संतापाची लाट उसळली आहे. या विधानामुळे अनेक ठिकाणी त्याच्यावर टीका होऊ लागली.
माफीनाम्यानंतरही विरोध कायम
विरोधाच्या पार्श्वभूमीवर कश्यपने इंस्टाग्रामवर स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला, “मी माफी मागतो – त्या एका वाक्यासाठी ज्याचा संदर्भ बाजूला ठेवून चुकीचा अर्थ काढला गेला. पण माझ्या मतांपासून मी मागे हटणार नाही.” त्याचा दावा आहे की, त्याच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना (death threats) बलात्कार व हत्येच्या धमक्या दिल्या जात आहेत.
‘फुले’ चित्रपटामुळे वाद
या संपूर्ण वादाचा एक भाग ‘फुले’ (Phule film) चित्रपटाशी संबंधित आहे. हा चित्रपट ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असून प्रतीक गांधी आणि पत्रलेखा प्रमुख भूमिकेत आहेत. 10 एप्रिल रोजी ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ब्राह्मण समाजातील काही सदस्यांनी चित्रपटातील काही गोष्टींवर आक्षेप घेतला होता. वादानंतर हा चित्रपट आता 25 एप्रिलला रिलीज होणार आहे.