Hina Khan Gets Married To Rocky Jaiswal | लोकप्रिय अभिनेत्री हिना खान (Hina Khan) हिने प्रियकरासोबत रॉकी जयस्वाल (Rocky Jaiswal) विवाह केल्याची घोषणा करून चाहत्यांना गोड धक्का दिला. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये हे दोघं विवाह नोंदणीच्या कागदपत्रांवर सह्या करताना दिसत आहेत. या पोस्ट्समुळे हे स्पष्ट झाले आहे की, दोघांनी पारंपरिक विवाह न करता कोर्ट मॅरेजचा मार्ग स्वीकारला आहे.
2014 पासून एकत्र असलेल्या हिना आणि रॉकीने अनेक प्रसंगांमध्ये एकमेकांसाठी असलेल्या प्रेमाचा आणि पाठिंब्याचा उल्लेख केला आहे. विशेषतः, 2024 मध्ये हिनाला कर्करोगाचे (cancer) निदान झाल्यानंतर रॉकीने भावनिक आधार दिल्याचे तिने अनेकवेळा बोलून दाखवले आहे.
लग्नाचे फोटो शेअर करत हिनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “दोन वेगवेगळ्या जगांतून आम्ही प्रेमाचं एक जग निर्माण केलं. आमचे मतभेद मिटले, हृदये एकरूप झाली आणि एक अमर नातं तयार झालं. आम्ही एकमेकांसाठी घर, प्रकाश आणि आशा आहोत. आज आमचं नातं प्रेम आणि कायद्याने कायमचं एक झाले आहे.” या पोस्टवर चाहते कमेंट्सच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा देत आहेत.
रॉकी जयस्वाल कोण आहे?
रॉकी जयस्वाल एक व्यावसायिक असून त्याने दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीत विविध भूमिका पार पाडल्या आहेत. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या प्रसिद्ध मालिकेचा तो सुपरवायझिंग प्रोड्युसर होता, ज्यामधूनच हिनाचं छोट्या पडद्यावर पदार्पण झालं आणि तिथेच दोघांची भेट झाली.
रॉकीने ‘मितवा – फूल कमल के’, ‘ससुराल सिमर का’ यांसारख्या मालिकांमध्ये असिस्टंट डायरेक्टर आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणूनही काम केलं आहे.
हिना आणि रॉकीने एकत्र येऊन ‘हिरोज फार बेटर फिल्म्स’ हे स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं. या बॅनरखाली त्यांनी जाहिराती, म्युझिक व्हिडिओ, वेब शो आणि इव्हेंट प्रॉडक्शन्स सारख्या अनेक प्रकल्पांवर काम केलं. त्यांच्या बॅनरखाली ‘कंट्री ऑफ ब्लाइंड’, ‘विशलिस्ट’ आणि ‘डोअरमॅन’ हे चित्रपटदेखील बनवले गेले आहेत.
रॉकी ‘रॉकबायट ॲप’चा निर्माता असून, हे ॲप नवोदित कलाकारांना मनोरंजन क्षेत्रात संधी मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलं आहे. याचबरोबर, तो हिनासोबत ‘कॅच क्लोदिंग’ या फॅशन ब्रँडचा सह-मालक आहे, जो स्टायलिश प्रिंटेड टी-शर्ट्स आणि ट्रेंडी कॅज्युअल वेअर यावर लक्ष केंद्रित करतो.
हिनाच्या कर्करोगावरील लढ्यादरम्यान रॉकी तिच्यासाठी आधारस्तंभठरला. ‘बिग बॉस 11’ मधील ‘फॅमिली वीक’मध्ये तो पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आला होता. त्यानंतर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या एका विशेष भागात दोघेही एकत्र दिसले होते, जिथे हिनाने त्याने दिलेल्या मानसिक आणि भावनिक आधाराबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या.