Sunjay Kapur | प्रसिद्ध उद्योगपतीआणि अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Karisma Kapoor) पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर (Sunjay Kapur) यांचे वयाच्या 53व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
इंग्लंडमध्ये पोलो खेळताना संजय यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यांचा जीव वाचवता आला नाही.
ज्येष्ठ लेखक सुहेल सेठ (Suhel Seth) यांनी ‘एक्स’वर शोकसंदेश शेअर करत याबाबत माहिती दिली.. “संजय यांच्या निधनाने मोठी हानी झाली. त्यांच्या कुटुंबाला आणि सोना कॉमस्टारमधील (Sona Comstar) सहकाऱ्यांना संवेदना,” असं त्यांनी लिहिलं.
संजय यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट (Social Media Post) काही तासांपूर्वीची होती. त्यात त्यांनी एअर इंडिया (Air India) विमान अपघातातील मृतांबद्दल दुःख व्यक्त केलं होतं. निधनापूर्वी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निधनाची बातमी समोर येताच करीना कपूर आणि सैफ अली खान करिश्माच्या मुंबईतील घरी पोहोचले.
कोण होते संजय कपूर?
संजय कपूर हे एक सुप्रसिद्ध भारतीय उद्योगपती होते आणि सोना ग्रुपचे संस्थापक, प्रसिद्ध उद्योगपती डॉ. सुरेंद्र कपूर यांचे ते पुत्र होते. भारतातील ऑटो कंपोनंट्स क्षेत्रात ते एक अग्रणी व्यक्ती होते. जगातील इलेक्ट्रिक वाहन आणि पारंपारिक वाहन उत्पादकांना महत्त्वपूर्ण प्रणाली आणि घटक (Components) पुरवणाऱ्या ‘सोना कॉमस्टार’ या जागतिक ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान कंपनीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी ऑटोमोटिव्ह कंपोनेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषवले होते.
आपल्या कॉर्पोरेट यशाव्यतिरिक्त, संजय कपूर त्यांच्या हाय-प्रोफाइल वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिले.
त्यांनी यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरशी लग्न केले होते. 2003 मध्ये त्यांचा विवाह झाला आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना समायराआणि कियान अशी दोन मुले आहेत. ते अधूनमधून मुंबईत आपल्या मुलांसोबत वेळ घालवताना दिसायचे. घटस्फोटानंतर संजय कपूर यांनी दुसरे लग्न केले. त्यांनी प्रिया सचदेव यांच्याशी विवाह केला, ज्या माजी मॉडेल आणि व्यावसायिक आहेत.