Home / मनोरंजन / सिद्धार्थ-जान्हवीचा ‘परम सुंदरी’ चित्रपट वादात; चर्चमधील दृश्यामुळे ख्रिस्ती संघटना आक्रमक

सिद्धार्थ-जान्हवीचा ‘परम सुंदरी’ चित्रपट वादात; चर्चमधील दृश्यामुळे ख्रिस्ती संघटना आक्रमक

Param Sundari Movie Controversy

Param Sundari Movie Controversy: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘परम सुंदरी (Param Sundari)’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चर्चमध्ये चित्रित केलेल्या एका रोमँटिक दृश्यावर एका ख्रिस्ती संघटनेने आक्षेप घेतला आहे आणि ते दृश्य काढून टाकण्याची मागणी केली आहे.

‘वॉचडॉग फाऊंडेशन’ नावाच्या एका ख्रिस्ती संघटनेने या दृश्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सेन्सॉर बोर्ड (CBFC), मुंबई पोलीस, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच महाराष्ट्र सरकारकडे याबाबत तक्रार केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सिद्धार्थ आणि जान्हवी चर्चमध्ये रोमँटिक सीन करताना दिसत असून, यावरूनच वाद निर्माण झाला आहे.

नेमका आक्षेप काय?

वॉचडॉग फाऊंडेशनचे वकील गॉडफ्रे पिमेंटा यांनी म्हटले आहे की, “चर्च हे ख्रिस्ती लोकांसाठी एक पवित्र प्रार्थनास्थळ ) आहे. त्याला अश्लील किंवा अनुचित मजकूर दाखवण्याचे ठिकाण बनवू नये. असे चित्रण केवळ धार्मिक स्थळाचा अनादर करत नाही, तर कॅथोलिक समुदायाच्या भावनांनाही दुखावते.”

फाऊंडेशनने म्हटले आहे की, जर चित्रपटातून आणि त्याच्या प्रमोशन व्हिडिओंमधून हे दृश्य काढले नाही, तर आम्ही सार्वजनिक आंदोलन करू. तसेच, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल मुख्य कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर एफआयआर (FIR) दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

‘परम सुंदरी’ चित्रपटाबद्दल

दरम्यान, परम सुंदरी चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिद्धार्थ आणि जान्हवीचा पहिलाच एकत्र चित्रपट आहे. यात सिद्धार्थ एका पंजाबी मुलाच्या भूमिकेत आहे, तर जान्हवीने दाक्षिणात्य मुलीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहे. ‘परम सुंदरी’ 29 ऑगस्ट 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.