Paresh Rawal Urine Therapy | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी चक्क स्वतःची लघवी पिल्याचा खुलासा केला आहे.
दुखापतीतून लवकर बरे होण्यासाठी 15 दिवस स्वतःची लघवी प्यायचे, असा खुलासा परेश रावल यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
परेश रावल यांनी सनी देओलसोबत ‘घातक’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा परेश रावल यांनी सांगितला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते जखमी झाले होते, तेव्हा अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांनी त्यांना स्वतःचे मूत्र पिण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरल्याचे त्यांनी सांगितले. ‘द लल्लनटॉप’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
चित्रपटातील एका सीनच्या शूटिंगदरम्यान परेश रावल यांच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा अजय देवगणचे वडील वीरू देवगण त्यांना भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी परेश रावल यांना स्वतःचे मूत्र पिण्याचा सल्ला दिला आणि या सल्ल्यामुळे ते खूप कमी वेळात बरे झाले, असा दावा परेश रावल यांनी केला आहे.
ते म्हणाले की, जेव्हा ते नानावटी रुग्णालयात दाखल होते, तेव्हा वीरू देवगण त्यांना भेटायला आले होते. त्यांनी विचारले, “काय झाले?” यावर परेश रावल यांनी सांगितले की, ते पडले होते. अजय देवगणच्या वडिलांनी त्यांची विचारपूस केली, तेव्हा अभिनेत्याने सांगितले की, “मला रुग्णालयात येऊन तीन-चार दिवस झाले आहेत.” यावर वीरू देवगण यांनी त्यांना विचारले की, ते त्यांचा सल्ला ऐकतील का? परेश रावल यांनी होकार दिल्यावर अजय देवगणच्या वडिलांनी त्यांना सकाळी उठल्यावर सर्वात आधी स्वतःचे मूत्र पिण्याचा सल्ला दिला.
वीरू देवगण यांनी त्यांना स्वतःचे मूत्र पिण्यासोबतच रात्री दारू न पिण्याचा आणि मटण खाणे बंद करण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यांना साधे अन्न खाण्याचा सल्ला दिला. परेश रावल यांनी सकाळी उठल्यावर सर्वात आधी स्वतःचे मूत्र पिण्याचे मान्य केले. ते म्हणाले की, “जर मला मूत्र प्यायचे असेल, तर मी ते एका झटक्यात पिणार नाही. मी ते बिअरप्रमाणे घोट-घोट करून पिणार आहे. कारण, जर ते करायचे असेल, तर पूर्णपणे करायचे.” अभिनेत्याने सांगितले की, जेव्हा ते 15 दिवसांनंतर डॉक्टरांकडे गेले आणि त्यांचे एक्स-रे पाहिले, तेव्हा डॉक्टरही चकित झाले. ते खूप लवकर बरे झाले आणि सुमारे दोन-अडीच महिन्यांत कामावर परतले. हे त्यांच्यासाठी एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हते.