Special Ops 2 Release Date | ‘स्पेशल ऑप्स’ (Special Ops 2) वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रॉ अधिकारी हिम्मत सिंगच्या भूमिकेतून के.के. मेनन (Kay Kay Menon) यांना पाहण्याची उत्सुकता असलेल्या प्रेक्षकांना आता आणखी काही दिवस सीरिज पाहण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
याआधी ‘स्पेशल ऑप्स’ सीरिज 11 जुलैला रिलीज होणार होती. मात्र, आता सीरिज 18 जुलै 2025 रोजी रिलीज होणार आहे. जिओहॉटस्टारने नवीन तारीख जाहीर करत शोचा प्रोमो क्लिप शेअर केला असून, या विलंबामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवीन रिलीज तारीख
‘स्पेशल ऑप्स सीझन 2’ आता 18 जुलै 2025 रोजी जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होईल. ओटीटी प्लॅटफॉर्मने शेअर केलेल्या पोस्टमध्ये “हिम्मत सिंग पुन्हा ॲक्शनमध्ये! तयार आहात का?” असे म्हटले आहे.
के.के. मेनन यांनी स्वतः इंस्टाग्रामवरून रिलीज डेट पुढे ढकलल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, काही अनपेक्षित परिस्थितींमुळे हा निर्णय घ्यावा लागला, जो त्यांच्या नियंत्रणाबाहेर होता. मात्र, त्यांनी दिलासा दिला की सर्व एपिसोड्स एकाच वेळी रिलीज होतील.
दरम्यान, नीरज पांडेआणि फ्रायडे स्टोरीटेलर्सने निर्मित या शोमध्ये हिम्मत सिंग आणि त्याची टीम सायबर दहशतवादाचे वास्तव दाखवणार आहे. डिजिटल धोक्यांविरुद्ध लढण्याचे महत्त्वाचे मिशन त्यांच्यासमोर असते, जे राष्ट्रीय सुरक्षेच्या वास्तविक धोक्यांवर प्रकाश टाकते.
या सीझनमध्ये के.के. मेननसह प्रकाश राज, विनय पाठक, ताहिर राज भसीन, करण टॅकर, सैयामी खेर, मुजम्मिल इब्राहिम, गौतमी कपूर, परमीत सेठी आणि काली प्रसाद मुखर्जी यांसारखे कलाकार दिसतील.