अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच पृथ्वीवर परतले! ट्रम्प यांनी शब्द पाळला! मोदींचे निमंत्रण! जगभरात जल्लोष


मुंबई- अवघ्या आठ दिवसांच्या मोहिमेवर गेलेले आणि अनेक तांत्रिक अडचणींमुळे तब्बल नऊ महिने अवकाश केंद्रावर अडकून पडलेले नासाचे अंतराळवीर भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर आज पहाटे सुखरूप पृथ्वीवर परतले आणि जगभरातील खगोलप्रेमींनी जल्लोष साजरा केला. जे नासा करू शकले नाही ते एलन मस्क यांच्या स्पेस एक्सने करून दाखवले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अंतराळवीरांचे स्वागत करताना मी दिलेला शब्द पाळला, मस्क यांचे धन्यवाद असे ट्विट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनिता विल्यम्स यांना भारत भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले.
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासह आणखी दोन अंतराळवीर आज पृथ्वीवर परतले. त्याचा नासाने उपलब्ध करून दिलेला व्हिडिओ थरारक आहे. एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सुलमध्ये सर्व अंतराळवीर बसले. हे कॅप्सूल दोन पॅराशुटच्या सहाय्याने अलगदपणे फ्लोरिडाजवळ समुद्रात उतरवण्यात आले. त्यानंतर हायड्रॉलिक यंत्रणेच्या सहाय्याने कॅप्सूल उचलून जहाजावर आणण्यात आले. काही वेळाने चौघा अंतराळवीरांना व्हिलचेअरवरून कॅप्सूलमधून बाहेर आणण्यात आले. सुनिता विल्यम्स आणि अंतराळवीरांनी हसतमुख चेहऱ्याने हात हलवून लोकांना अभिवादन केले.
हे अंतराळवीर आज पृथ्वीवर परतले असले तरी त्यांना आपल्या कुटुंबियांना 45 दिवसांनीच भेटता येणार आहे. नऊ महिने अवकाश स्थानकावरील सुक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये राहिल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी या अंतराळवीरांना 45 दिवस विशेष कक्षात राहावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना घरी जाता येईल. आजवरच्या सर्व अवकाश मोहिमांमध्ये ही अवकाश मोहीम संस्मरणीय ठरली याची अनेक कारणे आहेत. आजवर अनेक अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर नऊ महिन्यांहून जास्त काळ वास्तव्य करून आले आहेत. मात्र त्यापैकी कोणतीही मोहीम अशा प्रकारे लांबलेली नव्हती आणि कोणत्याही मोहिमेमध्ये या मोहिमेसारख्या तांत्रिक अडचणी आल्या नव्हत्या. त्यामुळे ही मोहीम अनेक अर्थाने विक्रमी ठरली. अवकाशात सर्वाधिक नऊ वेळा आणि एकूण 62 तास स्पेस वॉक करणाऱ्या सुनिता विल्यम्स या पहिल्या महिला अंतराळवीर ठरल्या.
5 जून 2024 रोजी सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर नासाच्या बोर्इंग सीएसटी-100 स्टारलायनर अवकाश यानाच्या सहाय्याने अवकाशात झेपावले. नासाची ही मोहीम अवघ्या आठ दिवसांची होती. बोर्इंग स्टारलायनरचे हे पहिलेच उड्डाण होते. अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर नेऊन आठ दिवसांनी पृथ्वीवर परत आणण्याची जबाबदारी नासाच्या स्टारलायनरची होती. यान अंतराळवीरांना घेऊन नियोजित कार्यक्रमानुसार अवकाश स्थानकावर पोहोचले. मात्र त्यानंतर यानाच्या थ्रस्टर्समध्ये बिघाड झाल्याचे आढळून आले. नासाच्या वैज्ञानिकांनी पृथ्वीवरून यानातील बिघाड दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयश आले. त्यामुळे नासावर जगभरातून टीका होऊ लागली.बिघाड झालेल्या स्टारलायनरमधून अंतराळवीरांना पृथ्वीवर आणणे धोक्याचे होते. त्यामुळे नासाने यानातून अंतराळवीरांना न आणण्याचा निर्णय घेतला. पुढे हे यान अंतराळवीरांना न घेता सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले. त्यामुळे पुन्हा एकदा नासावर चौफेर टीका झाली.
अखेर अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्यासाठी ट्रम्प यांच्या पुढाकाराने नासाने सप्टेंबर महिन्यात एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्ससोबत क्रू-9 मोहीम हाती घेतली. या यानामध्ये नासाचे नीक हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे दोन अंतराळवीर होते. यानामध्ये सुनिता विल्यम्स आणि विल्मोर यांच्यासाठी दोन आसने मोकळी ठेवली होती. या क्रू-9 मोहिमेतही तांत्रिक अडथळे आले. त्यामुळे अंतराळवीरांचा परतीचा प्रवास लांबणीवर पडत गेला. नासाने फेब्रुवारी महिन्यातही अंतराळवीरांना आणण्याचा प्रयत्न केला. पण तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. शेवटी या अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्याची जबाबदारी एलन मस्क यांच्यावर सोपवण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की ज्यो बायडन याआधीच्या राष्ट्राध्यक्षांनी या अंतराळवीरांना वाऱ्यावर सोडले. पण मी त्यांना सुखरूप आणण्याचे वचन देतो. त्यानंतर मस्क यांच्या यानातून त्यांना आणण्यासाठी नासाने 12 मार्च ही तारीख निश्चित केली. पण तेव्हा यानाला आधार देणाऱ्या यंत्रणेत बिघाड आढळला. मात्र दोनच दिवस विलंबाने 14 मार्च रोजी हे यान रवाना करण्यात आले. अशाप्रकारे वारंवार येत असलेल्या अडथळ्यांनंतर आणखी एक महिना विलंबाने हे अंतराळवीर आज भारतीय वेळेनुसार पहाटे 3 वाजून 17 मिनिटांनी पृथ्वीवर
सुरक्षित उतरले.
गुजरातमध्ये अखंड ज्योती
सुनिता विल्यम्स यांचे वडिल दिपक पांडे यांचे कुटुंबाचे घर गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील झुलासान गावात आहे. गावात सुनिता यांचे चुलत भाऊ नविन पंड्या आणि समस्त ग्रामस्थ कालपासून सुनिता यांच्या परतीच्या प्रवासाकडे डोळे लावून बसले होते. सुनिता सुखरुप पृथ्वीवर परताव्या यासाठी ग्रामस्थ देवाचा अखंड नामजप करत होते. घरांघरांत देवासमोर दिवे प्रज्वलित करण्यात आले होते.
मोदींनी जागवल्या आठवणी
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी अंतराळवीरांचे स्वागत करताना सुनिता विल्यम्ससोबतचा आपला एक जुना फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला. सुनिता विल्यम्स या जगासाठी एक आदर्श ठरल्या आहेत. त्यांना सुखरुप पृथ्वीवर सुखरुप परत आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या साऱ्यांचा मला अभिमान वाटतो,असे मोदी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले.