तेल आणि नैसर्गिक वायू साठेलिलावात रिलायन्सची बोली

नवी दिल्ली – तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा देशातील आजवरची सर्वात मोठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या लिलावामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिल्यांदाच ओएनजीसी आणि बीपी पीएलसी या कंपन्यांसह गुजरातमधील एका साठ्यासाठी संयुक्तपणे बोली लावली.देशभरातील १.३६ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये असलेल्या अशा २८ ठिकाणांचा (ब्लॉक्स) या लिलाव प्रक्रियेत समावेश होता. या ठिकाणी संशोधन करून खनीज तेल आणि नैसर्गिक वायू संपादित करण्याचे काम या कंपन्यांना करायचे आहे.तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) ही या क्षेत्रात काम करणारी सरकारी कंपनी आहे. तर बीपी पीएलसी ही एक दिग्गज कंपनी मानली जाते. या दोन्ही कंपन्यांसोबत रिलायन्स इंडस्ट्रिजने गुजरातच्या सौराष्ट्रमधील एका तेलसाठ्यासाठी ही संयुक्तपणे बोली लावली आहे. २०१७ पासून झालेल्या तेल आणि नैसर्गिक वायू साठ्यांच्या आठ लिलावांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीजने बीपी पीएलसीसोबत केवळ दोन साठ्यांसाठी बोली लावली होती. ते दोन्ही तेलसाठे या कंपन्यांना मिळाले आहेत.मात्र ओएनजीसीसोबत रिलायन्स इंडस्ट्रीजने लावलेली ही पहिलीच बोली आहे. वेदांत कंपनीनेही २८ ब्लॉक्स साठी बोली लावली आहें.