मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या ६० हजार कर्मचाऱ्यांपैकी अर्ध्याहून अधिक कर्मचारी पगार कपातीच्या धसक्याने पुन्हा कामावर परतले आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रूजू होण्यासाठी महापालिकेने मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र पाठवले होते. दरम्यान,विधानसभा निवडणूक काळात पालिका कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर होते. त्या कालावधीत पालिका कामाचा खोळंबा झाला होता. निकालानंतर १० दिवसांनंतर अनेक पालिका कर्मचारी कामावर रुजू झाले नव्हते.त्यामुळे पालिकेने रुजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पगार कपातीचा बडगा उगारला होता. पालिकेने वेतन कपातीचा बडगा उगारल्यानंतर अर्धे कर्मचारी परतले. मात्र, अजूनही अनेक कर्मचारी निवडणूक आयोगाकडून मुक्त केल्याचे पत्र मिळत नसल्याचे सांगत आहेत. या कर्मचाऱ्यांनीही त्वरित कामावर रूजू व्हावे, असे आवाहन निवडणूक विशेष कार्याधिकारी विजय बालमवर यांनी केले आहे.
