‘बविआ’ने गुजरातच्या१०० गाड्या अडवल्या

विरार- गुजरात पासिंगच्या १०० ट्रॅव्हल्स आणि इतर वाहने विरार शिरसाड फाट्यावर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काल अडवल्या. काल विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करत घेरले होते. या घटनेमुळे विरारमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर काल रात्री उशिरा विरारमध्ये बविआच्या कार्यकर्त्यांनी १०० हून अधिक वाहने अडवली. ही सगळी वाहने गुजरातमध्ये नोंदणी झालेली होती. मात्र नोंदणी झाली असली तरी त्यांना महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नाही. तरीही या बस मधून मतदार आणले जात होते असा आरोप झाला . त्यानंतर या सर्व वाहनांची तपासणी केली. या गाड्यांमध्ये काहीही आक्षेपार्ह अथवा संशयास्पद आढळले नाही. गाडीत मतदार नव्हते तर प्रवासी होते हे तपासात स्पष्ट झाल्यावर गाड्या सोडून देण्यात आल्या.