मुंबई – कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार केल्याचा आरोप असलेल्या बूक माय शो या कंपनीचा सीईओ आशिष हेमराजानी याने आज पोलिसांचे समन्स असताना चौकशीसाठी न जाता उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवासस्थानी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीसांनी त्याला भेट नाकारल्याने गेटवरूनच परत जावे लागले.कोल्डप्लेच्या तिकिटांचे बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांत शो हाऊसफुल्ल झाला. किमान अडीच हजार ते कमाल ३५ हजार असा तिकीटदर होता. मात्र शो हाऊसफुल्ल झाल्यानंतर तिकिटांचा काळाबाजार सुरू झाला. अडीच हजार रुपयांचे तिकीट काळाबाजारात तीन-चार लाख रुपये विकले जाऊ लागले. यामध्ये बूक माय शो या कंपनीने तिकिटे परत विकत घेऊन ती चढ्या दराने विकली असा आरोप आहे.मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करीत आहे. हेमराजानी याला आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावून आज सकाळी ११ वाजता कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. आज त्याने चौकशीला न जाता गृहमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन पोलिसांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला असे म्हटले जाते . याआधी त्याला दोन समन्स पाठविण्यात आली होती. तेव्हादेखील त्याने राजकीय दबाव आणण्याचा प्रय़त्न केला होता.
