सिद्दिकी हत्येप्रकरणी २ अटकेत आतापर्यंत १८ आरोपी जेरबंद

पुणे – माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून आणखी दोन आरोपींना अटक केली. काल रात्री पुण्यातून पकडलेल्या या आरोपींना मुंबईत आणण्यात आले असून, तपासात त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अटकेनंतर या प्रकरणात आतापर्यंत एकूण १८ आरोपींना अटक केली आहे. पोलीस तपासात स्पष्ट झाले की, आरोपींना त्यांच्या टार्गेटची संपूर्ण माहिती होती. हत्या करण्यासाठी त्यांच्याकडे शस्त्रे लपवून ठेवली होती, त्यांच्याकडून सुमारे ४० गोळ्या जप्त केल्या आहेत. फरार आरोपी शुभम लोणकर याने या दोघांना हत्येत वापरण्यासाठी शस्त्रे पुरवली होती आणि ती लपवून ठेवण्यास सांगितले होते. या प्रकरणी पोलिसांनी आता आरोपींची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा थेट संबंध आहे.