नवी दिल्ली –
भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर हादरलेल्या पाकिस्तानने काल रात्री भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हल्ला करण्याची आगळीक केली. पाकिस्तानच्या या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानात अखेर अघोषित युद्ध सुरू झाले. भारताने पाकिस्तानचे हे हल्ले निष्फळ केले. त्यानंतर पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर इतका जबरदस्त प्रतिहल्ला केला की, पाकिस्तान पुरता हादरून गेला. पाकिस्तानची चार लढाऊ विमानेही भारताने पाडली. त्याच्या एक पायलटना ताब्यात घेतले.
काल रात्री 8.30 वाजता बिथरलेल्या पाकिस्तानने लढाऊ विमान, मिसाईल आणि ड्रोनद्वारे जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात हल्ले केले. पाकिस्तानी लष्कराने सर्वात प्रथम श्रीनगर, उधमपूर, सांबा सेक्टर, जम्मूमधील विमानतळ, रेल्वे स्थानक आणि वैष्णोदेवी मंदिर, उपायुक्त कार्यालयासह आजूबाजूच्या 8 ठिकाणांवर मिसाईल आणि ड्रोनने हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यासोबत उरी आणि बारामुला, पुंछ, राजौरी परिसरातील सीमारेषेवर पाकिस्तानी लष्कराने जोरदार गोळाबार केला. त्यामुळे संपूर्ण जम्मू आणि श्रीनगरसह काश्मीरमध्ये सायरन वाजून ब्लॅकआऊट करण्यात आला. मात्र क्षेपणास्त्रे आणि ड्रोन भारतीय लष्कराने हवेत पाडले. तर पाकिस्तानचे दोन ड्रोन जम्मू विद्यापीठ परिसरात कोसळले.
पंजाबच्या पठाणकोट लष्करी विमानतळांसह जालंधरमध्येदेखील रात्री पाकिस्तानी लष्कराने ड्रोनने हल्ल्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. येथे देखील भारतीय लष्कराने पाकिस्तानचे ड्रोन हवेत निष्क्रीय केले. या कारवाईदरम्यान पठाणकोट, जालंधर, मोहाली, चदींगडसह आजूबाजूच्या भागांत ब्लॉकआऊट करण्यात आला. राजस्थानमधील जैसलमेर आणि पोकरण लष्करी ठिकाणांसह रामगढमध्ये पाकिस्तानी लष्कर ड्रोनद्वारे हल्ला करण्याच्या आधीच भारतीय लष्करानेही ड्रोन हवेतच नष्ट केले. याठिकाणी पाकिस्तानचे एक जेएफ-16 लढाऊ विमानही कोसळले.
भारतीय लष्कर आणि नौदलाने तत्काळ वरचढ घेऊन कराची, लाहोर आणि इस्लामाबादसह 12 महत्त्वाच्या शहरांत जोरदार हल्ला केला. त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानात ब्लॅकआऊट झाला. त्यासोबत भारताने जैसलमेलमध्ये पाकिस्तानचा पायलट ताब्यात घेतला.
पंजाब, जम्मू आणि राजस्थानमध्ये हल्ला प्रयत्नानंतर लगेच रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी दोन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत बैठक सुरू केली, तिसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व अर्धसैनिक दलांच्या महासंचालकांची बैठक घेतली. अमेरिकेच्या विदेशमंत्र्यांनी भारताचे विदेश मंत्री जयशंकर यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली.
या बैठकांचे सत्र सुरू असताना भारतीय लष्कराने एकामागून मिसाईल आणि ड्रोनद्वारे लाहोर, पेशावर, रावळपिंडी आणि कराची, राजधानी इस्लामाबाद, सियालकोट, फैसालबादसह 12 शहरांत जोरदार हल्ला करुन पलटवार केला. भारतीय नौदलाचे आयएनएस विक्रांत देखील लढाईच्या मैदानात उतरली. तिने कराची बंदरावर जोरदार हल्ला केला. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने संपूर्ण देशात ब्लॅकआऊट करण्यात आला. भारताच्या हल्ल्यात कराची आणि लाहोरमधील पाकिस्तानी लष्कराच्या रडार प्रणाली उद्ध्वस्त झाली. त्यामुळे भारतीय लष्कराला पाकिस्तानमधील लाहौरसह 12 शहरांत हल्ला करण्यात मोठी मोकळीक मिळाली. रात्रभर एकामागून एक हल्ला करणाऱ्या भारतीय लष्कराचे आणि नौदलाचे सामर्थ्य पाहून पाकिस्तानी लष्करात एकच गोंधळ उडाला आणि पाकिस्तानच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक पंतप्रधान शरीफ यांनी बोलावली. मात्र भारतीय लष्कराचे पाकिस्तानवर हल्ले सुरुच होते. त्यामुळे पाकिस्तानमध्ये एकच हाहाकार उडाला. इस्लामबाद, कराची, पेशावर, रावळपिंडी शहरांत रात्री उशिरापर्यंत स्फोट होत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.
भारताने पाकिस्तानची चार विमाने पाडल्याचे रात्री उशिरा सांगण्यात आले. यातील एक पायलटना भारतीय लष्कराने ताब्यात घेतले होते.
