अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू


नवी दिल्ली – या वर्षीच्या अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची नोंदणी करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने आजपासून सुरू केली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय नोंदणीसाठी खुले आहेत. भाविकांना अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र आणि अन्य आवश्यक कागदपत्र जोडावी लागणार आहेत. दररोज केवळ १५ हजार भाविकांना यात्रेला जाण्याची संधी मिळणार असल्याने आतापासूनच नोंदणीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.यंदा २५ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत अमरनाथ यात्रा होणार आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यातील अमरनाथ देवस्थान हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. दरवर्षी हजारो भाविक अमरनाथ यात्रेमध्ये सहभागी होतात. यात्रेदरम्यान भाविकांना चोख सुरक्षा पुरविता यावी आणि यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी दररोज पंधरा हजार भाविकांना यात्रेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात येणार आहे.