अमूल ब्रँडचे उत्पन्न १ लाख कोटी होणार

नवी दिल्ली – भारतातील आघाडीचा दुग्धजन्य उत्पादनांचा ब्रँड असलेल्या अमूल सहकारी संस्थेचे एकूण उत्पन्न १ लाख कोटी होण्याची शक्यता आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड ही सहकारी संस्था अमूल ब्रँड अंतर्गत विविध दुग्धजन्य उत्पादनांची विक्री करते. या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता म्हणाले की, २०२५- २६ आर्थिक वर्षात अमूल ब्रँडचे एकूण उत्पन्न १ लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. या सहकारी संस्थेच्या आगामी आर्थिक वर्षात १४ टक्के वाढीचे लक्ष्य ठेवले असून एकूण उलाढाल ७५ हजार कोटी रुपयांवर नेण्याचा उद्देश आहे. कंपनीचे १८ जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ स्थानिक बाजारात स्वतंत्र उत्पादन विक्री करतात. ते संघ दररोज ३.५० कोटी लिटर दूध संकलन करतात.यातून २५,००० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. अमूलचे २०२३-२४ मध्ये एकूण उत्पन्न ८० हजार कोटी रुपयांवरून ९० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढले. सहकारी संस्था ही जगातील सर्वात मोठी शेतकरी मालकीची दुग्ध सहकारी संस्था असून ती गुजरातमधील १८,६०० गावांतील ३६ लाख शेतकऱ्यांशी जोडलेली आहे.