नवी मुंबई- नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील ३० एकरावर असलेला संपूर्ण डीपीएस तलाव यापुढे फ्लेमिंगोच्या संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत केली.
नेरूळ सीवूड्स येथील अनिवासी संकुलाच्या जवळ असलेल्या या तलावात फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवास व कांदळवन आहे. हा तलाव संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याची आवश्यकता असल्याचे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी या बैठकीत मांडले. फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील पामबीच मार्गालगत डीपीएस शाळेजवळ हा तलाव आहे. सिडकोच्या अखत्यारीत असलेल्या या तलावात गेली अनेक वर्षे जवळच्या खाडीचे पाणी येत आहे. मुबलक खाद्या उपलब्ध होत असल्याने फ्लेमिंगोंचे थवेच्या थवे या तलाव क्षेत्रात येत असतात.
नॅटकनेक्ट फाऊंडेशन, एन्व्हायर्नमेंट प्रिझर्वेशन सोसायटी, सेव्ह फ्लेमिंगोज अॅन्ड मॅग्रोव्हज फोरम, खारघर हिल अॅन्ड वेटलॅण्ड ग्रुप या पर्यावरण संस्थांनी हा तलाव फ्लेमिंगोंच्या संवर्धनासाठी राखीव ठेवण्यासाठी अनेकदा आंदोलने केली होती. त्यामुळे गेल्यावर्षी जुलैमध्ये वन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने केलेल्या स्थळ पाहणी अहवाल शासनाला सादर केला आहे. त्यानंतर आता या मागणीला मंजुरी मिळाली आहे.
