मुंबई – वरळी मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी लोअर परेल येथील शिवसेना शाखा क्रमांक १९८ येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर खा. अरविंद सावंत, खा. अनिल देसाई, खा. प्रियंका चतुर्वेदी, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुभाष देसाई, आमदार अजय चौधरी, आ. सचिन अहिर, सुनील शिंदे, आदेश बांदेकर उपस्थित होते. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. या मिरवणुकीत आदित्य यांचे धाकटे भाऊ तेजस विशेष लक्ष वेधून घेत होते. जवळजवळ दोन तास ही मिरवणूक सुरू होती. यावेळी हे मशाल हे ठाकरे गटाचे चिन्ह आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हातात घेऊन अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते.
