मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा तीन दिवसांसाठी खासगी दौऱ्यावर दरे गावी दाखल झाले आहेत. त्यांच्या प्रत्येक गावच्या दौऱ्यावेळी त्यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते. काल अमरावती विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईला पोहोचले. त्यानंतर सायंकाळी हेलिकॉप्टरने पत्नीसह दरे गावी रवाना झाले. याठिकाणी तीन दिवस त्यांचे धार्मिक आणि कौटुंबिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे यांचा दरे गावी दौरा असताना महायुतीत निधी वाटप, रायगड-नाशिक पालकमंत्रिपद या मुद्यांवरून तक्रार असल्याची चर्चा आहे. या चर्चा सुरू असतानाच ते अचानक दरे गावात गेले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी स्नेहभोजन घेतले. त्यानंतरही राजकीय चर्चांना उधाण आले होते.
याठिकाणी उद्या घरगुती कार्यक्रम होणार असून, शनिवार 19 एप्रिलला ग्रामदैवत जननी देवीची त्यांच्या हस्ते पूजा होणार आहे. या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, महाशय परत गावाला गेले आहेत. मला आता भीती वाटते आज पौर्णिमा आहे की अमावास्या आहे? आता कोणाचा बकरा कापणार आहे? महाराष्ट्र एवढा अंधश्रद्धाळू कधीच नव्हता. हा फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंचा पुरोगामी महाराष्ट्र आहे.
