काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण खर्चात १४० कोटींची कपात

मुंबई- यंदा मुंबई महापालिकेने रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.त्यामुळे आगामी पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे भरण्याच्या खर्चात ६० टक्के म्हणजेच गेल्यावर्षीच्या खर्चाच्या तुलनेत तब्बल १४४ कोटी रूपयांची घट झाली आहे.

पालिका प्रशासनाने गेल्यावर्षी मुंबईतील खड्डे भरण्यासाठी २२० कोटींची निविदा काढली होती, तर यंदा केवळ ७९ कोटी रुपयेच खर्च केले जाणार आहेत. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात गेल्यावर्षाच्या तुलनेत १४० कोटींची घट करण्यात आली आहे. मुंबईतील रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. ते बुजवण्यासाठी विविध प्रयोग केले जातात. खड्ड्यांवरून महापालिकेला नेहमीच लक्ष्य करण्यात येते. खड्डे बुजवल्यानंतरही त्याच ठिकाणी पुन्हा-पुन्हा खड्डे पडत असल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते. त्यामुळे पालिकेने रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे.महापालिकेच्या ताब्यात जवळपास २०५० किमीचे रस्ते आहेत. त्यांपैकी गेल्या काही वर्षांत १३३३ किमी म्हणजेच ६५ टक्के रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे.उर्वरित रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे पालिकेने दोन टप्प्यांत हाती घेतली आहेत. या काँक्रिटीकरणात टप्पा १ मधील रस्त्यांचे ७५ टक्के आणि टप्पा २ मधील ५० टक्के काँक्रिटीकरण ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.त्यामुळे यंदा खड्डे भरण्याच्या खर्चात मोठी कपात करण्यात आली आहे.