कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून मेक्सिकोत पहिले मूल जन्मले


मेक्सिको- मेक्सिकोमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मिलाफातून पहिले मूल जन्माला आले आहे. ही ऐतिहासिक वैद्यकीय चमत्काराची माहिती रीप्रॉडक्टीव्ह बायोमेडिसीन ऑनलाइन या जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. ग्वाडालाजारा येथील बायोटेक्नॉलॉजी कंपनी कन्सेव्हेबल लाईफ सायन्सेस या संस्थेच्या ॲम्ब्रायोलॉजिस्ट डॉ. जॅक कोहेन यांच्या नेतृत्वातील तज्ज्ञांनी विकसित केलेल्या स्वयंचलित प्रणालीच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी केला. एआयच्या मदतीमुळे कृत्रिम गर्भधारणेत क्रांती आली असून आता ती शंभर टक्के यशस्वी होऊ शकणार आहे.
मेक्सिकोतील होप आयव्हीएफ केंद्रात एका 40 वर्षीय या महिलेची दान केलेल्या डोनर एग (बिज)च्या सहाय्याने गर्भधारणा करण्यात आली होती. या गर्भधारणच्या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही मानवी हस्तक्षेपाचा सहभाग नसल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. या नवीन प्रणालीद्वारे 5 पैकी 4 बिजांचे यशस्वीरित्या फलन झाले. त्यापैकी एक सशक्त भ्रूण आरोग्यदायी ब्लास्टोसिस्टमध्ये विकसित करून गर्भाशयात सोडण्यात आले. या प्रक्रियेतून एका निरोगी बाळाचा जन्म झाला. या प्रयोगात आयसीएसआय प्रक्रियेच्या पर्यायाचा वापर केल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
आयसीएसआय या पद्धतीचा वापर 1990 च्या दशकापासून सुरू आहे. ही प्रणाली ॲम्ब्रायोलॉजिस्ट्सच्या सहाय्याने अंमलात आणली जाते. परंतु यामध्ये अनेक टप्पे असल्यामुळे या प्रक्रियेला मानवी मर्यादा येतात. ती थकवणारी असते. नवीन स्वयंचलित प्रणालीने या प्रक्रियेचे 23 टप्पे एआय आणि रिमोट डिजिटल नियंत्रणाद्वारे पूर्ण करण्यात आले. त्यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय ही प्रक्रिया पूर्ण झाली.
हा प्रयोग करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचे नेतृत्व करणारे डॉ. कोहेन यांच्या मते, या प्रणालीने आयव्हीएफ प्रक्रियेमध्ये एक मोठी क्रांती घडणार आहे. त्यामुळे भविष्यात वंध्यत्वाच्या उपचारांमध्ये मानवी क्षमतेच्या पलीकडची अचूकता आणि कार्यक्षमता येऊ शकते. या स्वयंचलित प्रणालीने शुक्राणूची निवड, ते लेझरद्वारे स्थिर करणे आणि बिजांमध्ये इंजेक्शन हे सर्व टप्पे जलद आणि अचूकपणे पार पडले.