मुंबई- दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदि नेते उपस्थित होते.
तत्पूर्वी, सह्याद्री अतिथीगृहावर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत तब्बल तासभर चर्चा केली. या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतुल लिमये उपस्थित होते.बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात रणनीती आखण्यात आल्याचे समजते. दरम्यान, शहा यांनी काल माजी मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत बैठक घेतली होती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची माहिती त्यांनी जाणून घेतल्याचे वृत्त आहे. संघटनात्मक बैठकीनंतर शहा यांनी पत्नीसमवेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन व आरती केली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेही उपस्थित होते. त्यानंतर शहा हे फडणवीस आणि शिंदे यांच्यासह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब सोबत होते. मात्र, लालबागचा राजा मंडळाचे विश्वस्त अनंत अंबानी याप्रसंगी कुठेही दिसले नाहीत.लालबागचा राजाचे दर्शन घेतल्यानंतर शहा यांनी वांद्रे येथे जाऊन आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पाचे, तसेच अंधेरीतील मोरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पाचे दर्शन घेतले.
