काठमांडू – चीनचे समर्थक असलेले केपी शर्मा ओली हे नेपाळचे पंतप्रधान होणार आहेत. पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड यांचे सरकार पडल्यानंतर काल त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे.ओली यांनी १९६६मध्ये नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला होता. नव्वदीच्या दशकात, पंचायत राजवट रद्द करणाऱ्या चळवळीतील त्यांच्या प्रयत्नांमुळे ओली यांना लोकप्रियता मिळाली. २०१५ मध्ये ५९७ पैकी ३३८ मते मिळवून ते पंतप्रधान म्हणून निवडून आले. तथापि, जुलै २०१६ मध्ये नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाने (माओवादी-केंद्र) पाठिंबा काढून घेतल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला.२०२०मध्ये भानू जयंतीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात बोलताना ओली यांनी, भगवान राम भारतीय नव्हते तर नेपाळी होते. खरी अयोध्या भारतात नाही तर नेपाळच्या बीरगंजमध्ये आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करताना भारतावर सांस्कृतिक दडपशाहीचा आरोपही केला होता .ओली यांनी नेपाळी काँग्रेसचे शेर बहादूर देउबा यांच्यासमवेत राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेसाठी अर्ज सादर केला आहे. रविवारी दुपारपर्यंत त्यांचा शपथविधी होणार आहे.
