मुंबई – कोरोना काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेले मुंबई उपनगरातील गोराई परिसरातील पक्षी उद्यान पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. या उद्यानात सुमारे ७० विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे दर्शन मुंबईकर तसेच देश-विदेशातील पर्यटकांना घडणार आहे.
हे उद्यान खासकरून पक्षी प्रेमी आणि अभ्यासकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे. या उद्यानातील प्रजातींची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आलेली नाही.मात्र या उद्यानात ७० विविध प्रजातींचे ५०० हून अधिक पक्षी आहेत. त्यात परदेशी पक्ष्यांची संख्या जास्त आहे. आता उद्यानातील प्रत्येक पक्ष्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी उद्यान प्रशासनाने एक विशिष्ट वेळापत्रक तयार केले आहे. यानुसार, दर १५ दिवसांनी प्रत्येक पक्ष्याची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. पक्ष्यांचे वजन आणि त्यांच्या पोषणमूल्यांच्या गरजा निश्चित करणे आदी बाबी त्यात समाविष्ट आहेत. याचबरोबर कोणत्याही पक्ष्याला तपासणीअंती आरोग्य समस्या उद्भवल्यास त्यावर तत्काळ वैद्यकीय उपचार केले जातील. यामुळे पक्ष्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि त्याचे आयुर्मानही वाढेल.