मुंबई – शहीद, उपकार, पुरब और पश्चिम पासून ते अगदी क्रांती पर्यंत अनेक देशभक्तीपर चित्रपटांमुळे रसिकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केलेले अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक मनोज कुमार यांचे आज मुंबईत निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. मनोज कुमार यांच्या निधनाने संपूर्ण देशातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
मनोज कुमार यांचे मूळ नाव हिरकिशन गिरी गोस्वामी असे होते. 24 जुलै 1937 मध्ये एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. पाकिस्तानच्या खैबर पख्तनुख्वा भागातून ते स्वातंत्र्यानंतर दिल्लीत आले. कला शाखेतील पदवी मिळवल्यानंतर चित्रपटात आपले नशीब अजमावण्यासाठी ते मुंबईत आले. 1957 साली आलेला फॅशन हा त्यांचा पहिला चित्रपट होता. लहान मोठ्या भूमिका केल्यानंतर 1965 साली आलेल्या शहीद चित्रपटाने त्यांना स्टारपदावर पोहोचवले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. चॉकलेट हिरो म्हणून नायकाच्या भूमिकेत गुमनाम, पत्थर के सनम, नीलकमल असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले असले तरी उपकार, पुरब और पश्चिम, आदमी, रोटी कपडा और मकान, दस नंबरी अशा देशभक्तीपर चित्रपटांनी त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. देशात ते भारतकुमार म्हणून ओळखले जाऊ लागले. 1981 साली त्यांनी क्रांती या बिगबजेट चित्रपटाची निर्मिती केली होती. देशाप्रती प्रेम, सद्यस्थितीवर केलेल्या भाष्याची कथानके व संयत सोपा अभिनय, सादरीकरणात नाविन्य ही त्यांची काही वैशिष्ट्येे होती. त्यांना 1992 साली पद्मभूषण व 2015 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मनोज कुमार यांच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी आपली आदरांजली वाहिली.
