ज्येष्ठांची सवलत रद्द करून रेल्वेने कमावले ८९१३ कोटी

नवी दिल्ली- भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात असलेली सवलत कोरोना काळापासून रद्द केली आहे. ही सवलत अद्याप पुन्हा सुरू केलेली नाही. परंतु यामुळे रेल्वेने मात्र बक्कळ कमाई केली आहे. मागील पाच वर्षांत रेल्वेला ही सवलत रद्द केल्याने ८९१३ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसुल मिळाला आहे. ही बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे.

मध्यप्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी माहिती अधिकाराखाली केलेल्या अर्जाला उत्तर देताना रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, सवलत बंद केल्यानंतर तिकिटापोटी पुरुष प्रवाशांकडून अंदाजे ११,५३१ कोटी, महिला प्रवाशांकडून ८,५९९ कोटी, तर तृतीयपंथी प्रवाशांकडून रेल्वेला २८.६४ लाख उत्पन्न मिळाले. या सर्वांकडून रेल्वेला २०,१३३ कोटी रुपयांचा एकूण महसूल मिळाला आहे. पुरुष प्रवाशांना असलेली ४० टक्के व महिला प्रवाशांची ५० टल्के सवलत पाहता रेल्वेला अतिरिक्त ८,९१३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. रेल्वेने २० मार्च २०२० पासून कोरोना सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची सवलत रद्द केली होती. त्यावेळी ६० वर्षांवरील पुरुषांना रेल्वे तिकिटात ४० टक्के, तर महिलांना ६० टक्के सवलत मिळत होती. परंतु ही सवलत काढल्यामुळे रेल्वेला आतापर्यंत अतिरिक्त ८९१३ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले असल्याचे उत्तर रेल्वेने माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांना दिले आहे.