ट्रम्पने चिडून भारतावर कर लावताच रशियाकडून तेल खरेदी थांबवली?

नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात अमेरिका व्यापारी विचार करून रशियाला विरोध करीत त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी रशियाकडून तेल विकत घेऊ नका असे त्यांनी भारताला सांगितले, पण भारताने ऐकले नाही. त्यावर संतापून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर घसघशीत 25 टक्के आयातकर लावला. यामुळे अस्वस्थ होऊन भारताने अखेर रशियाकडून तेल आणि लष्करी सामग्री खरेदी बंद केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ही माहिती जाहीर केली. भारताने यावर अद्याप उत्तर दिलेले नाही.ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, माझ्या माहितीनुसार भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. मी तसे ऐकले आहे. हे खरे आहे की नाही, हे मला माहीत नाही, पण हे एक चांगले पाऊल आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भारतातील सरकारी तेल शुद्धीकरण कंपन्यांनी गेल्या आठवड्यापासून रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवली आहे. इंडियन ऑईलकॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि मेंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या चारही सरकारी कंपन्यांनी गेल्या आठवड्यात रशियाकडून कोणतीही नवीन तेल खरेदी केली नाही. एवढेच नव्हे तर भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी रशियन टँकरना भारतात तेल उतरवण्यास मनाई केली आहे. तेलाचे किमान चार रशियन टँकर गुजरातच्या जामनगरजवळ समुद्रात थांबले होते. परंतु भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी हे तेल स्वीकारण्यास नकार दिला आहे. तेल स्वीकारायचे की नाही याबाबतच्या सरकारी आदेशाची या कंपन्या वाट पाहत आहेत. मात्र याबाबतीत संबंधित कंपन्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यातआलेली नाही.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना रशियाकडून तेल खरेदीबद्दल प्रश्न विचारला असता मोघम उत्तर देत ते म्हणाले, इंधन खरेदीच्या गरजांबाबत आमचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काय उपलब्ध आहे, कोणत्या दराने ते मिळत आहे आणि जागतिक परिस्थिती काय आहे याचा विचार करून आम्ही निर्णय घेत आहोत. भारतीय तेल कंपन्यांनी रशियन तेलाची आयात थांबवल्याच्या बाबतीत आम्हाला कोणतीही विशिष्ट माहिती नाही. कोणत्याही देशासोबतचे आमचे संबंध गुणवत्तेवर आधारित आहे .पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतर रशियन तेलाच्या किमती कमी झाल्या. त्याचा फायदा घेत भारताने रशियाकडून अधिक प्रमाणात तेल खरेदी सुरू केली होती. भारत रशियाकडून आपल्या गरजेच्या सुमारे 35 टक्के जास्त म्हणजे दररोज 2 लाख लिटरहून अधिक तेल रशियाकडून घेत होता. जानेवारी ते जून 2025 या सहामाहीत भारताने दररोज 1.75 दशलक्ष बॅरल तेल आयात केले.युक्रेनने रशियाविरूध्द उठाव करून स्वातंत्र्यासाठी युद्ध छेडले. त्याबरोबर खनिजाने समृद्ध असा युक्रेन आपल्या काबूत आणावा यासाठी अमेरिकेने युक्रेनला मदत करण्यास सुरुवात केली. शेवटी युक्रेनवर दबाव आणून अमेरिकेने त्यांच्या खनिजावर ताबा मिळवणारा करार करायला लावला . रशियाला युक्रेनचा ताबा मिळू नये यासाठी अमेरिकेने रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करणार्‍या भारत व इतर देशांवर खरेदी बंद करण्याचा दबाब टाकायला सुरुवात केली आहे. युक्रेन युद्धात लढणार्‍या प्रत्येक सैनिकासाठी रशियाला 1 दशलक्ष डॉलर खर्च येत आहे. रशियाला तेल विक्रीतून हा निधी उभा करावा लागत आहे. रशिया यासाठी भारत, चीन आणि ब्राझिलला होणार्‍या तेलविक्रीवर अवलंबून आहे. या देशांवर दबाव टाकल्यास रशियाला मित्र उरणार नाही. त्यामुळे युक्रेन युद्धासाठी पैसा गोळा करणे रशियाला अशक्य होईल, असा अमेरिकेचा विचार आहे. त्यामुळेच अमेरिकेने या देशांवर आयात शुल्क लादून रशियाची कोंडी करायला सुरुवात केली आहे. त्यासाठीच भारतावर दबाव आणला आणि भारताला तेल खरेदी थांबवायला लावली असे अमेरिका सांगत आहे. जोवर भारत अधिकृत उत्तर देत नाही तोवर संभ्रम कायम राहील .