तुम्ही घाबरु नका! सगळे काही चांगले होईल! राहुल गांधी काश्मिरात! शहीद कुटुंबांची भेट


श्रीनगर- लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी आज काश्मीरमधील पुंछमध्ये दाखल झाले. पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला.
पूंछ गावातील अनेक घरांचे पाकिस्तानी ड्रोन व तोफगोळ्यांच्या हल्ल्यात नुकसान झाले आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राहुल गांधी यांनी पुंछमधील ख्राईस्ट स्कूलला भेट दिली. या शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. राहुल गांधी यांनी या शाळेला भेट देत तेथील शाळकरी मुलांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी मुलांना दिलास दिला की, सगळे काही ठीक होईल. लव यु ऑल.
राहुल गांधी आज सकाळी साडेदहा वाजता जम्मू विमानतळावर पोहोचले. तिथून ते हेलिकॉप्टरने पुंछला पोहोचले. या शहरातील पाकिस्तानी गोळीबाराने नुकसान झालेल्या घरांना त्यांनी भेट दिली. तेथील नुकसानीचा आढावा घेतला. त्या घरातील लोकांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. पाकिस्तानच्या हल्ल्यात जीव गमावलेली दोन जुळी भावंडे झियान अली व उर्वा फातिमा यांच्या डुंगुस भागातील घरी जाऊन राहुल गांधी यांनी त्यांच्या पालकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी ते म्हणाले की, मला माहीत आहे की हे मोठे संकट आहे. या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यांच्या मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले आहे. पीडितांपैकी एकाने त्यांना सांगितले की, आमचे 15 लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र प्रशासन केवळ 1 लाख 20 हजार इतकीच नुकसान भरपाई देत आहे. राहुल गांधींनी या प्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. पूंछ गावातील ख्राईस्ट स्कूलमध्ये ते गेले. या शाळेतील झियान अली, उर्वा फातिमा हे जुळे बहीण भाऊ व रिहान भार्गव या तीन विद्यार्थ्यांचा वॉर्ड नंबर तीनमध्ये झालेल्या पाकिस्तानी तोफांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या वर्गातील मुलांशी संवाद साधला. त्यांच्याकडून आपल्या दिवंगत मित्रांविषयी माहिती जाणून घेतली. मुलांना आता घाबरुन न जाण्याचा सल्ला राहुल गांधी यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी शिक्षकांशी व नंतर काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना मिठीत घेऊन त्यांनी गमावलेल्या मित्रांविषयी विचारपूस केली. यावेळी एका मुलीने त्यांना या दिवसांमध्ये काय घडले याची माहिती दिली. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, तुम्ही धोका पाहिला आहे. ही भीतीदायक वेळ पाहिली आहे, अनुभवली आहे. या संकटाचा मुकाबला करण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही घाबरु नका. सर्व काही व्यवस्थित होईल. खूप मन लावून अभ्यास करा. भरपूर खेळा व शाळेत खूप जणांशी मैत्री करा. सगळे काही व्यवस्थित होणार आहे.
राहुल गांधींनी पुंछमधील सिंग सभा गुरुद्वाराला भेट दिली. तिथे त्यांनी अमरसिंग सिंग या माजी सैनिकाची भेट घेतली पाकिस्तानी तोफेच्या हल्ल्यात त्यांच्या पत्नीचा तोफेचा गोळा लागून मृत्यू झाला आहे.
राहुल गांधी यांनी यानंतर आपल्या एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी आज पुंछमध्ये झालेल्या तोफांच्या माऱ्यात जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना भेटलो. पडलेली घरे, विखुरलेले सामान, साश्रूऍनयन आणि प्रत्येक कोपऱ्यात आपल्या कोणाला तरी गमावल्याच्या दु:खाच्या कथा. हे देशभक्त नागरिक प्रत्येक वेळी युद्धाचा भार धाडसाने व अभिमानाने उचलत असतात. त्यांच्या या धैर्याला सलाम आहे. मी या सर्व पीडित कुटुंबियांच्या सोबत आहे. त्यांच्या मागण्या व मुद्दे राष्ट्रीय पातळीवर नक्कीच पुढे
आणण्यात येतील.
ओमर अब्दुल्ला यांच्याकडून स्वागत राहुल गांधी यांच्या आजच्या भेटीचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले की, हे चांगले आहे की, ते राहुल गांधी पुंछमधील लोकांना भेटले आहेत. त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. राहुल गांधींचा मी आभारी आहेच, त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसच्या पाच सदस्याचाही मी आभारी आहे. ते रस्तेमार्गे इथे आले व ते आता जम्मू-काश्मीरच्या पीडितांशी संवाद साधत आहेत. मी म्हणत नाही की सगळे काही लगेच चांगले होईल. मात्र सगळे दिलेल्या सूचनांनुसार काम करण्याचा प्रयत्न करू.