धाराशीव – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी वेगवेगळ्या स्वरुपात ७० कोटी रुपयांचे दान तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आले आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या आर्थिक वर्षात ४८ कोटी ३२ लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम, तसेच १७ किलो ६२० ग्रॅम सोने आणि २५६ किलो चांदी देवीला अर्पण करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर हे राज्यातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. येथे वर्षभर हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेषतः नवरात्रोत्सव आणि चैत्रोत्सव काळात मंदिरात भाविकांची गर्दी लक्षणीय असते. मंदिरात ठेवलेल्या दानपेट्या, गुप्त दानपेट्या, तसेच अभिषेक पूजा, सिंहासन पूजेतून व सशुल्क पास यामार्फत मंदिर समितीला हे उत्पन्न मिळते.
