त्यांनी आपल्या कपाळावर वार केला! आपण त्याच्या छातीवर वार केला! बदामी छावणीत राजनाथ सिंह यांचे दमदार भाषण

श्रीनगर– ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आले. या दौऱ्यात त्यांनी श्रीनगरमधील बदामी बाग छावणीला भेट दिली. तिथे केलेल्या दमदार भाषणात राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानने आपल्या कपाळावर वार केला. आपण त्याच्या छातीवर वार केला. आता तरी पाकिस्तानने आपल्या कारवाया थांबवाव्यात. अन्यथा त्याचे खूप परिणाम वाईट होतील.
बदामी छावणीतील कार्यक्रमात जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हेही उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना सुरुवातीला राजनाथ सिंह यांनी शहीद जवान आणि पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना नमन केले. त्यांनी जखमी सैनिकांच्या धाडसाला आणि जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनी दहशतवाद्यांबद्दल ज्या प्रकारे आपला रोष व्यक्त केला आहे त्याबद्दल त्यांनाही सलाम केला. ते सैनिकांना उद्देशून म्हणाले की, या कठीण परिस्थितीत तुमच्यासोबत असल्याचा मला खूप अभिमान आहे. तुम्ही ज्या प्रकारे शत्रूच्या चौक्या आणि दहशतवादी अड्डे नष्ट केलेत ते त्यांच्या कायम स्मरणात राहील. संपूर्ण देशाच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आज सर्व देशवासियांचा पोस्टमन म्हणून याठिकाणी आभार मानण्यासाठी उपस्थित आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूरद्वारे तुम्ही शत्रूला सडेतोड उत्तर दिले. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. शत्रूला पराभूत करण्याची ती ऊर्जा अनुभवण्यासाठी मी येथे आलो आहे. ऑपरेशन सिंदूर फक्त एका मोहिमेचे नाव नसून आमची वचनबद्धता आहे. दहशतवादाविरोधात केलेली ऑपरेशन सिंदूर ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई आहे. 35 ते 40 वर्षांपासून भारत सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादाचा सामना करत आहे. मात्र या कारवाईतून आपण दाखवून दिले की, भारत दहशतवादाविरोधात कोणत्याही टोकापर्यंत जाऊ शकतो. भारताने शत्रूला दाखवून दिले की आम्ही फक्त संरक्षण करत नाही, तर परिस्थितीनुसार कठोर निर्णय घेऊन त्यानुसार कारवाईही करतो. दहशतवादी तळावर पोहोचून शत्रूची छाती फाडून दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्याचे जवानांचे स्वप्न ऑपरेशन सिंदूरने पूर्ण केले.
ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान हा मागणाऱ्यांचा देश आहे. अलिकडेच पाकिस्तानने आयएमएफकडे कर्ज मागितले. त्याच आयएमएफला भारत निधी देतो. रामचरित मानसच्या दोह्याप्रमाणे जहां सुमति तहं संपति नाना, जहां कुमति तहं विपत निधाना| म्हणजेच जिथे सुबुद्धी आहे तिथे समृद्धी आहे. जिथे दुर्बुद्धी आहे तिथे आपत्ती आहे. दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करून भारताची सामाजिक एकता तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारताच्या कपाळावर वार केला, आपण त्यांच्या छातीवर वार केला. पाकिस्तानच्या या जखमांना एकच औषध आहे ते म्हणजे त्यांनी भारतविरोधी दहशतवादी संघटनांना आश्रय देणे बंद करावे. त्यांच्या भूमीचा वापर भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी होऊ देऊ नये. पाकिस्तानने भारताला नेहमी दगा दिला आणि आजही दगा देत आहे. त्याचीच किंमत त्यांना मोजावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दात दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, भारतभूमीवर केलेला कोणताही दहशतवादी हल्ला ही युद्धकृती मानली जाईल. दोन्ही देशांमध्ये सध्या झालेली युध्दबंदी ही सीमेपलीकडून कोणतेही चुकीचे काम होणार नाही या आश्वासनावर आहे. त्याचे उल्लंघन झाले तर त्याचे परिणाम खूप खोलवर होतील. दहशतवाद आणि चर्चा कधीही एकत्र होऊ शकत नाही. दोन्ही देशांमध्ये चर्चा झालीच तर दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर या मुद्यावरच होईल.