*गोव्यातील शैक्षणिक
धोरणात मोठा बदल
पणजी – गोवा राज्यात पुढील वर्षांपासून म्हणजे २०२६-२०२७ पासून दहावीत चार विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे,मात्र जोपर्यंत संबंधित विद्यार्थी या विषयांमध्ये उत्तीर्ण होत नाही,तोपर्यंत त्याला पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार नाही,अशी माहिती शालांत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इयत्ता दहावीसाठीदेखील नवीन शैक्षणिक धोरण लागू केले जाईल. यासाठी शाळांत मंडळाकडून परीक्षा आणि अभ्यासक्रमाचे परिपत्रक जारी केले आहे.त्यानुसार इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सहा शैक्षणिक आणि चार कौशल्याच्या संदर्भातील विषय शिकवले जाणार आहेत.शैक्षणिक विषयांमध्ये तीन भाषा, म्हणजे इंग्रजी, हिंदी, मराठी व इतर यासह गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र असे विषय शिकवले जातील. या सहा विषयांपैकी चार विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या माध्यमातून प्रवेश दिला जाईल.
नवीन शिक्षण धोरणात विज्ञान या विषयासाठी ७० गुण असतील तर इतर विषयांच्या लेखी परीक्षा ८० गुणांच्या असणार आहेत आणि राहिलेले गुण अंतर्गत परीक्षणातून दिले जाईल. आंतरविद्याशाखीय क्षेत्र, एनएसक्यूएफ, कला आणि शारीरिक शिक्षण हे कौशल्याचे विषय असणार आहेत.या चारही विषयांचे लेखी परीक्षांसाठी ४० गुण असतील आणि अंतर्गत ६० गुण दिले जातील. दोन कौशल्य विषयांमध्ये ६५ पेक्षा अधिक गुण असल्यास एच किंवा आय ग्रेड असलेल्या शैक्षणिक विषयांमधील गुण सुधारतील, मात्र यासाठी उर्वरित दोन कौशल्य विषयांमध्ये ५० गुण असणे आवश्यक असणार आहे.