मुंबई- धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी निवडलेल्या मिठागराच्या जमिनी गेल्या अनेक वर्ष समुद्रसंपर्कापासून बाहेर असून त्या सुरक्षित आहेत. त्याचप्रमाणे ही सर्व जमीन पूर्व द्रुतगती मार्गाच्या पश्चिमेला आहे, असे स्पष्टीकरण डीआरपी म्हणजेच धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर श्रीनिवास यांनी दिले आहे.
धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचे मुलुंड, कांजूरमार्ग आणि भांडुप परिसरातील मिठागर जमिनींवर पुनर्वसन केले जाणार आहे. परंतु, काही जणांनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून याला विरोध दर्शविला आहे. यावर स्पष्टीकरण देताना धारावी पुनर्वसन पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास म्हणाले की, या मिठागर जमिनींचा सॉल्ट कमिशनर ऑफ इंडियाकडून मीठ उत्पादनासाठी होणारा वापर बंद आहे. त्याठिकाणी मागील १० वर्षांत मिठाचे उत्पादन झालेले नाही. पूर्व द्रुतगती मार्ग झाल्यानंतर या भागात समुद्राचे पाणी पोहचलेले नाही. त्यामुळे ही जागा स्वस्त गृहप्रकल्पासाठी वापरण्यास कोणताही धोका उद्भवणार नाही. ही जागा पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याचप्रमाणे या मिठागर जमिनी सीआरझेड क्षेत्रात येत नाहीत. स्थलांतरित फ्लेमिंगो पक्षीही पूर्व भागात येतात आणि हा मिठागर जमीन भाग पश्चिमेला आहे. तरीही ही जमीन घरांसाठी घेताना आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करून आवश्यक परवानगी घेतली जाणार असल्याचे श्रीनिवास यांनी स्पष्ट केले आहे.