Home / News / धोम धरणातून रविवारी पाण्याचे पहिले आवर्तन

धोम धरणातून रविवारी पाण्याचे पहिले आवर्तन

कोरेगाव – विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या फेऱ्यात अडकलेल्या धोम धरणाच्या पाण्याच्या पहिल्या रोटेशनबाबत जलसंपदा विभागाने निर्णय घेतला आहे.धोम धरण पाणी बचत संघर्ष समितीने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे २४ नोव्हेंबर रोजी पहिले रोटेशन सोडले जाणार आहे.वाई, जावळी,सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजित शिवाजीराव फाळके यांनी यासंदर्भात सांगितले की, यावर्षी झालेल्या प्रचंड पावसामुळे धोम धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून उन्हाची तीव्रता जाणवू लागल्यानंतर धरणातून पहिले रोटेशन सोडावे,अशी मागणी करण्यात आली होती.मात्र,विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देऊन जलसंपदा विभागाने त्याबाबत कार्यवाही केली नव्हती. तरीही शेतकऱ्यांच्या ऊस पिकासह अन्य पिकांना पाण्याची नितांत गरज असल्याने तातडीने पहिले रोटेशन सोडावे, यासाठी समितीने पाठपुरावा केला होता.त्यामुळे अखेर २४ नोव्हेंबर रोजी पहिले रोटेशन सोडत असल्याचे सातारा सिंचन मंडळाचे अध्यक्ष अभियंता जयंत नाईक व कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांनी समितीला कळविले आहे.