पहलगामच्या दहशतवाद्यांवर 20 लाख इनामकाश्मिरात पोस्टर! मोदींची आदमपूरला भेट


श्रीनगर – पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला असला तरी हा हल्ला करणारे दहशतवादी अजूनही सापडलेले नाही. भारतीय तपास यंत्रणा त्यांचा कसून शोध घेत आहेत. दहशतवाद्यांचा ठावठिकाणा लागावा यासाठी आता तपास यंत्रणांनी त्यांची पोस्टर जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी लावली आहेत. या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 20 लाख रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट देऊन सैन्याचे मनोबल वाढवले. हा हवाई तळ आपण हल्ला करून उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात एकूण सहा दहशतवादी सहभागी असल्याचा संशय आहे. यातील ओळख पटलेल्या तीन दहशतवाद्यांची पोस्टर जम्मू आणि काश्मीरमध्ये लागली आहेत. यात अनंतनागचा रहिवासी अदिल हुसेन ठोकर, अली भाई उर्फ तल्हा भाई आणि हाशीम मुसा उर्फ सुलेमान यांचा समावेश आहे. तल्हा आणि हाशीम मुसा हे पाकिस्तानी आहेत. हे तिघेही भारतात बंदी असलेल्या लष्कर-ए-तोयबाचे सदस्य आहेत. दहशतवादमुक्त भारत असे शीर्षक असलेल्या या पोस्टरवर उर्दूत मजकूर लिहिला असून, त्यात असे म्हटले आहे की, हे निरपराध लोकांना मारणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. त्यांची माहिती देणाऱ्यास 20 लाख दिले जातील. खाली माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांकही दिले आहेत.
अनंतनाग पोलिसांनी त्यांच्या एक्स हँडलवरही एक पोस्ट शेअर केली. त्यात असे म्हटले आहे की, या भ्याड हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 20 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली. ऑपरेशन सिंदूरनंतरची एखाद्या लष्करी ठिकाणाला दिलेली त्यांची पहिली भेट होती. हा हवाई तळ हल्ला करून उडवल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. पण, मोदींनी स्वतः तिथे पोहोचून पाकिस्तानच्या खोट्या दाव्याची पोलखोल केली. या भेटीत पंतप्रधानांनी भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी 6 मेच्या रात्री पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत जवानांशी संवाद साधला. त्यांचे कौतुक केले.
मोदी यांनी हाऊज द जोश असे म्हणताच सैनिकांनी त्याला हाय सर, असा प्रतिसाद दिला. त्यामुळे वातावरण जोशपूर्ण झाले. मोदींनी अचानक भेट दिल्याने जवानांचा उत्साह वाढला. मोदींनी या भेटीचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले.
मोदी सैनिकांना संबोधित करताना म्हणाले की, भारत
माता की जय या घोषणेची ताकद नुकतीच सगळ्या जगाने पाहिली. ही फक्त घोषणा नाही, तर जे जवान भारत मातेच्या सन्मान आणि प्रतिष्ठेसाठी जीवाची बाजी लावतात, त्या प्रत्येक सैनिकाची ही शपथ आहे. तुमच्या शौर्यामुळे आज ऑपरेशन सिंदूरचा आवाज कानाकोपऱ्यात ऐकू येत आहे. ते भित्र्यासारखे लपून आले, पण त्यांनी ज्यांना आव्हान दिले ते भारतीय सैन्य होते हे ते विसरले. तुम्ही त्यांच्यावर समोरून हल्ला केला आणि त्यांना संपवलेत. दहशतीचे प्रमुख तळ उद्ध्वस्त केले. दहशतवादाच्या सूत्रधारांना समजले की भारताकडे डोळे वटारल्याचा एकच परिणाम होईल. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून तुम्ही देशाचे मनोबल वाढवले आहे. तुम्ही भारताच्या कुंकवाचे रक्षण केले. यामुळे भारताच्या सन्मानाला नवीन उंची मिळाली. तुम्ही असे काही केले जे अभूतपूर्व होते.तुमचा वेग आणि कारवाई इतका अफाट होती की शत्रूही स्तब्ध झाला. ऑपरेशन सिंदूरचा प्रत्येक क्षण भारतीय सशस्त्र दलांच्या ताकदीची साक्ष देणारा आहे. पाकिस्तानने पुन्हा दहशतवादी कारवाया किंवा लष्करी धाडस केले तर आम्ही त्याला चोख उत्तर दिले जाईल. भारताला शांतता हवी आहे. पण जर माणुसकीवर हल्ला झाला, तर युद्धाच्या आघाडीवर शत्रूचा नाश कसा करायचा हे भारताला चांगलेच माहिती आहे.