पुण्यात आयटी अभियंता तरुणीची;इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पुणे – पुण्यातील हिंजवडी परिसरात अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (२५) या आयटी अभियंता तरुणीने २१ मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना हिंजवडीतील द क्राऊन ग्रीन सोसायटीत घडली.
अभिलाषा कोथिंबिरे ही हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. ती आणि तिची मैत्रीण एकत्र या सोसायटीत राहत होत्या. ती पहाटे दुचाकीवरून इमारतीत आली आणि लिफ्टने थेट २१ व्या मजल्यावर गेली. आत्महत्येपूर्वी अभिलाषाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात चिठ्ठीत म्हटले की, मला माफ करा. मी स्वतःच्या इच्छेने हे करत आहे. माझी जगायची इच्छा संपली आहे.
घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीच्या पार्किंगमध्ये सापडलेल्या दुचाकीवरून अभिलाषाची ओळख पटली. तिचा मृतदेह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
अभिलाषाच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले की, रात्री एक वाजेपर्यंत अभिलाषा रूममध्ये होती. सकाळी पाच वाजता उठल्यावर ती दिसली नाही. त्या वेळी बाथरूमच्या भिंतीवर रक्ताचे डाग होते. पण फारसे लक्ष दिले नाही. पुन्हा सकाळी दहा वाजता उठल्यावर अभिलाषा परतली नव्हती आणि तिचा फोन बंद होता. काही वेळाने पोलिसांकडून आत्महत्येची माहिती मिळाली. त्यानंतर रूमची पाहणी केली असता तिच्या बेडवर नॅपकिन आणि इतर वस्तूंवरही रक्ताचे डाग दिसले.