बदलापूर – ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे एमआयडीसीचे बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. बारवी धरणात सध्या ३३९.५६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध झाला असून या धरणातून विसर्ग सुरू झाला आहे.त्यामुळे बारवी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बारावी धरणाची उंची ७२.६० मीटर इतकी असून या धरणावरील ११ स्वयंचलित दरवाजांच्या वाटे १४० क्यूसेक पाणी ओसंडून वाहत आहे.ठाणे जिल्ह्यातील ६ महापालिका, २ नगरपालिका आणि औद्योगिक क्षेत्राला बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो.त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने ऑगस्टच्या सुरुवातीलाच भरल्यामुळे पुढील वर्षभर ठाणे जिल्ह्यावरील पाणी कपात संकट टाळणार आहे.कारण यंदा जून अखेरपर्यंत पाऊस न पडल्यामुळे या धरणात २९ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला होता. मात्र तरीही पाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्यात पाणी कपात लागू केली नव्हती.त्यामुळे पावसाला अजून दोन महिने शिल्लक असतानाच हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पुढील वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा सध्या बारवी धरणात उपलब्ध झाला आहे.