भाईंदरमध्ये मेट्रो कारशेडसाठी १२ हजार झाडांची कत्तल करणार

भाईंदर – मिरा- भाईंदरमध्ये मेट्रो लाईन- ९ आणि इतर मार्गिकांना थांबा देण्यासाठी एमएमआरडीए प्रशासनाने भाईंदर पश्चिमेच्या डोंगरी येथे सरकारी जागेवर मेट्रो कारशेडची जागा निश्चित केली आहे. त्यासाठी १२,४०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. मात्र एमएमआरडीएच्या या निर्णयाला स्थानिक डोंगरी ग्रामस्थांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आम आदमी पार्टी, मनसे आणि काही सामाजिक संस्थांनी जोरदार विरोध दर्शवित आंदोलनाचा इशारा दिला आहे.

झाडांची कत्तल करून काम करण्यासंदर्भात पालिका आणि एमएमआरडीए प्रशासनाने कोणतीच माहिती न देता किंवा त्याची नोटीस प्रसिद्ध न करता नागरिकांना पक्षाची घरटी असल्यास शोधावी व हरकत नोंदवावी अशी फक्त नोटीस एका स्थानिक वृत्तपत्रात दिली होती. या नोटीसवरून शहरातील जागरूक नागरिकांनी शेवटच्या अंतिम टप्यात हजारो निवेदने देऊन आपली हरकत नोंदविली होती. त्यामुळे याबाबत प्रशासनाने पालिकेत एकत्रित जनसुनावणी घेतली. यावेळी सर्व उत्तन, पाली, चौक, डोंगरी व मिरा- भाईंदरमधील नागरिकांनी कडाडून विरोध करत मेट्रो कारशेड नको आणि निसर्गावर कुर्‍हाड फिरून असणारा विकास आम्हाला नको अशी भूमिका घेतली. त्याचप्रमाणे ही नोटीस एका कुठेही स्टॉलवर न दिसणार्‍या आणि खप नसलेल्या एका स्थानिक वृत्तपत्रात दिल्याचा आरोप करण्यात आला आणि नोटीस प्रसिध्द करणार्‍या सहाय्यक आयुक्त कांचन गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.