भारतीय तरुणाला अमेरिकेत ३५ वर्षांचा तुरुंगवास

वॉशिंग्टन – अमेरिकेत राहणाऱ्या ३१ वर्षीय भारतीय वंशाच्या साई कुमार कुरेमुला ३५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तो बाललैंगिक शोषणाच्या आरोपात दोषी ठरला आहे. ३५ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही त्याला आजीवन नजरकैदेत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
साई कुमार हा एडमंड, ओक्लाहोमा येथे राहत होता. तो किशोरवयीन असल्याचे भासवून सोशल मीडियावर अल्पवयीन मुला-मुलींशी मैत्री करीत त्यांचा विश्वास जिंकत होता . त्यानंतर तो त्यांना अश्लील व्हिडीओ, फोटो पाठवण्यास भाग पाडत असे. जर त्यांनी नकार दिला तर त्यांना धमकावत असे . एप्रिल २०२३ मध्ये साई कुमारच्या विरोधात बाललैंगिक शोषणाचा आरोप झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये एफबीआयने एका सोशल मीडिया मेसेजिंग अॅपवरील संशयास्पद खात्याची चौकशी सुरू केली होती. या तपासात किमान १९ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये एफबीआयने त्याला अटक करून त्याच्यावर बाललैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला न्यायालयाने ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे.