पुणे- डिपॉझिट म्हणून 10 लाख रुपये रक्कम न भरल्यामुळे तनिषा भिसे या गरोदर महिलेवर उपचार करण्यास नकार दिलेले पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आज अखेर ताळ्यावर आले. रुग्णालयाने पत्रक काढले की, यापुढे आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णाकडून एक पैसाही डिपॉझिट घेणार नाही. त्यात त्यांनी या प्रकरणात आपली बाजू मांडण्याचाही प्रयत्न केला. रुग्णालय म्हणून घडलेल्या घटनेत आपला काही दोष नाही, अशी मखलाशी त्यात केली. इतकेच नव्हे तर लता मंगेशकर यांच्या नावाच्या पाटीला काळे फासल्याने त्यांना यातना झाल्या असतील असेही म्हटले.
रुग्णालयाबाहेर आजही आंदोलने सुरू राहिली. भिसे कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेऊन आपली कैफियत मांडली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना कारवाईचे आश्वासन दिले.
काल रुग्णालयाने तनिषा भिसे प्रकरणी चौकशी करून अहवाल जाहीर केला होता. आज या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या विश्वस्तांची आत्मचिंतन बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. बैठकीनंतर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी एक पत्रक जारी केले. त्यात ही घटना आणि त्यानंतर रुग्णालयाने घेतलेले निर्णय याची सविस्तर
माहिती दिली.
तनिषा भिसे घटनेबाबत रुग्णालयाने म्हटले आहे की, कालचा दिवस दीनानाथच्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता. आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसरच्या अंगावर चिल्लर फेकली. महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई-वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व तोडफोड केली. एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळे फासले. या सर्व गोष्टी बेजबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोरच घडल्या. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली. या घटनेचा लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे. हेचि काय फळ मम तपाला इथपासून ते या समाजात चांगले काम करूच नये, अशा प्रकारचे सर्व विचार व सल्ले प्राप्त झाले. या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाने सखोल चर्चा करून लोक कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत, या विषयाला राजकीय रंग कसा येत आहे, हे सोडून आपले काय चुकत आहे यावर आत्मचिंतन केले. हा सर्व विचार करीत असताना एक शब्द आमच्या सर्वांच्या मनात काळोख्या रात्रीतील विजेसारखा चमकून गेला. असंवेदनशीलता अर्थात व्यवहाराच्या चौकटीमध्ये आदर्शवादाचा किंवा संवेदनशीलतेचा कोंडमारा झालेल्या दुर्दैवी घटनेमागे व मृत्यूमागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे जरी चुकीचे असले तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रति संवेदनशीलता दाखवली नाही का, हे आम्ही तपासत आहोत. सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः त्यांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा, बाकी आम्ही सर्व मदत करू असे सांगितले. मात्र कोणालाही न कळवता ते निघून गेले. जेव्हा दीनानाथ सुरू झाले तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जात नसे. परंतु जसे उपचार व शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले. तसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास सुरुवात झाली. कालच्या उद्विग्न करणाऱ्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला. यापुढे दिनानाथ रुग्णालय आपत्कालीन परिस्थितीत आलेल्या कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नाही. मग तो रुग्ण इमर्जन्सी रूममध्ये असो,प्रसूतीसाठी असो किंवा लहान मुलांच्या विभागातला असो. विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी असा ठराव केला व आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच, परंतु ह्या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत.
रुग्णालयाकडून हा खुलासा होत असतानाच या प्रकरणी आज पिडीत भिसे कुटुंबाने भाजपा आमदार अमित गोरखे यांच्यासह बालेवाडी येथील महसूल कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी कुटुंबाने मुख्यमंत्र्यासोबत या घटनेची सविस्तर चर्चा केली. त्यांनी पिडीत कुटुंबाला याप्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रकरणी समिती नेमल्याचीही माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी त्यांना आश्वस्त केले सदर कारवाई केवळ या प्रकरणापुरतीच न करता, भविष्यात अशी प्रकरणे घडू नयेत यासाठी शासन आवश्यक काळजी घेणार आहे. त्या दृष्टीने शासनाचा कारवाई करण्याचा प्रयत्न आहे. मी नेमलेल्या समितीचा जोपर्यंत अहवाल येत नाही. तोपर्यंत आता तरी बोलणे योग्य ठरणार नाही. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायद्यामध्ये बदल करून धर्मादाय आयुक्तांना नुकतेच काही अधिकार दिले आहेत. सर्व धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाइनच्या माध्यमातून एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ज्या माध्यमातून कोणत्या रुग्णालयात किती बेड आहेत? किती दिले आहेत या सर्व गोष्टींची एका ठिकाणावरून निरीक्षण करता येईल. त्यासोबतच मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्ष या यंत्रणेशी जोडण्याचा आमचा विचार असून जेणेकरून या सर्व गोष्टींवर दबाव राहील, असा आमचा प्रयत्न आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय लतादीदी आणि मंगेशकर कुटुंबानी मोठ्या मेहनतीतून उभारले आहे. या ठिकाणी अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात. त्यामुळे सगळ्याच गोष्टी या रुग्णालयाच्या वाईट आहेत, असे म्हणता येणार नाहीत. मात्र झालेला प्रकार हा असंवेदनशील होता. त्यामुळे जिथे चूक असेल तिथे चूक म्हणावेच लागेल. रुग्णालयाला त्यांची चूक सुधारावी लागेल.
याबाबत मयत तनिषा भिसे यांच्या नणंद प्रियंका पाटील यांनी माध्यमांना सांगितले की, आमचा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. ते आम्हाला न्याय मिळवून देतील. डॉक्टर घैसास आणि मंगेशकर रुग्णालयावर कारवाई व्हावी. अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, रुग्णालयाबाहेर आजही आंदोलने सुरू राहिली. काल पतित पावन संघटनेने रुग्णालयाच्या नावाच्या फलकाला काळे फासले होते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने दिनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या नावाची पाटी काढली. आज पोलिसांनी रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. लहूजी शक्ती या संघटनेने अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. यावेळी या संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या गच्चीवर जाऊन या घटनेचा निषेध केला. मराठा संघटनेने रुग्णालयाच्या विरोधात पोस्टर हातात घेऊन निदर्शने केली. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवून नाणी उधळली. यावेळी त्यांनी रुग्णालयात शासकीय योजनांचा लाभ रुग्णांना मिळत नसल्याचा आरोप केला.
चंद्रकांत पाटील कुठे आहेत?
राज्यात हे प्रकरण एवढे गाजत असताना त्याच मतदारसंघाचे कोथरूड मतदारसंघाचे भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
