मुंबई – ओबीसीतून मराठा आरक्षण द्या, या मागणीसाठी नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हजारो मराठा समाजबांधव आज भल्या सकाळीच आझाद मैदानावर दाखल झाले . संपूर्ण आझाद मैदान आंदोलकांनी तुडुंब भरले . भगवे वादळ मुंबईत धडकले असे वर्णन केले जात होते . मैदानासमोरच असलेल्या सीएसएमटी स्थानकातही आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली होती. कुलाबा ते दादरपर्यंत संपूर्ण वाहतूक कोलमडून पडली. मराठा आंदोलक यावेळी महिनाभर मुक्कामाच्या तयारीने आले आहेत.
आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. इथे आल्यावर सीएसएमटी परिसरातील औषधाची दुकाने, हॉटेल मुद्दाम बंद केली. सरकारने छळ करण्यासाठी हा प्रकार सुरू केला असा आरोप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज म्हणाले की, मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, यातून कायदेशीर मार्ग काढावा लागेल. त्यासाठी समिती नेमली आहे. ते मागण्यांच्या यादीवर कार्य करीत आहेत. आम्ही त्यांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. शिक्षणापासून रोजगारापर्यंत सर्व आम्हीच दिले आहे. त्यामुळे सरकार सकारात्मक आहे. पण काही लोक मराठा व ओबीसी यांना झुंजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी त्यांना सांगतो की तसे करू नये कारण त्यांचे तोंड पोळेल. समिती आंदोलकांशी चर्चा करीत आहे. वेगवेगळ्या स्तरावर ही चर्चा सुरू आहे. चर्चेतून मार्ग निघेल. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नसल्याचे आज पुन्हा
स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषदेत आंदोलनावरून उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, आरक्षण देऊ असे शिवाजी महाराजांच्या शपथेवर सांगणार्यांना ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याविषयी विचारले पाहिजे. देवेंद्र फडणवीस पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री होऊनही प्रश्न का सुटला नाही. ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याच्या प्रश्नावर माझ्या म्हणण्याला सध्या काहीही अर्थ नाही, असे वेळोवेळी सांगत ठाकरेंनी या मुद्याला बगल दिली. राज ठाकरे मात्र काहीही बोललेले नाहीत. अजित पवार यांनी दुपारपर्यंत आंदोलनाबाबत वक्तव्य केले नव्हते. मात्र संध्याकाळी पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी आंदोलनाबाबत आपले मत व्यक्त केले. तिकडे आझाद मैदानात उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील मविआ व सत्ताधारी आमदार भेटीसाठी सतत आझाद मैदानात येत होते. बीडचे खासदार बजरंग सोनावणे, परभणीचे खासदार बंडू जाधव, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके , आमदार संदीप क्षीरसागर, कैलास पाटील, अभिजीत पाटील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आंदोलनस्थळी येऊन जरांगे यांची
भेट घेतली.
आझाद मैदानावर भव्य मंच उभारला आहे. यावर जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासमोर सर्वच वाहिन्यांचे प्रतिनिधी कॅमेरा लावून उभे आहेत. मंचावरील बॅनरवर गरजवंत मराठ्यांचा लढा असे लिहिले आहे. मंचावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यासोबत नंतर गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. मंचाशेजारी शिवरायांचा अश्वारूढ पुतळाही आहे. आझाद मैदानात हजारो मराठा आंदोलक आले आहेत. एक मराठा, लाख मराठा, पाटील पाटील पाटील अशा घोषणांनी परिसर दुमदुमून जात आहे. आझाद मैदानावर जेवढी गर्दी होती, त्यापेक्षा अनेक पटीने जास्त आंदोलक हे मैदानाबाहेर होते. सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांची प्रचंड गर्दी होती. पालिका मुख्यालयाबाहेरचा रस्ता आंदोलकांनी व्यापून टाकला. तेथील सामान्य वाहतूक बंद करण्यात आली. पण पावसाची रिपरिप सुरू झाली आणि मैदानात अक्षरशः चिखल झाला. तरीही आंदोलक हटत नव्हते . मी जरांगे लिहिलेल्या टोप्या आणि भगवी उपरणे घालून आंदोलक मैदानात धडकतच होते . यावेळी पोलीस बाहेर कुठेच दिसत नव्हते . पोलीस चौकीतच बसून राहिले .
हे आंदोलक मुंबईत अनेक दिवस मुक्काम करण्याच्या तयारीने आले आहेत . टेम्पोमध्येच धान्य , भाजीपाला , गॅस सिलिंडर असे सर्व सामान आणले असून फूटपाथवर त्यांनी सर्वांसाठी स्वयंपाक करण्यास सुरूवात केली . काही टेम्पोत आत बदल करून झोपण्याची व्यवस्था केली आहे. सीएसएमटी परिसरातील सर्व दुकाने आज बंद होती. खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही प्रशासनाकडून आंदोलकांमध्ये जाण्यास मनाई केली जात होती. आंदोलकांची कोंडी करण्यासाठीच हा सरकारचा डाव असल्याचा आरोप आंदोलकांच्या टेम्पोवरील स्पीकरवरून केला जात होता.
मुंबईत सर्व दिशेने आंदोलक येऊ लागल्यावर सकाळी वाहतूक कोंडी झाल्यानंतर आंदोलकांच्या गाड्या आझाद मैदानाच्या दिशेने जाणे अशक्य झाले. पूर्व द्रुतगती मार्गावरच आंदोलकांच्या गाड्या थांबल्या होत्या. तेव्हा पोलिसांनी आंदोलकांना लोकलमध्ये बसवून आंदोलनाच्या दिशेने मार्गस्थ केले. हार्बर लाईनवरील रेल्वे स्थानकांवरही एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुरू होत्या. कल्याण , सोलापूर , पुणे इथूनही आंदोलक येत होते. आंदोलनासाठी मुंबईभर जवळपास साडेसात हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सर्व रेल्वे स्थानकांवर वाढीव बंदोबस्त आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली.
आंदोलनामुळे लोकल सेवेला मोठा फटका बसला. रस्ते वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे स्वतः मनोज जरांगे पाटील यांनीच तातडीने रस्त्यांवरील वाहने ठिकठिकाणी पार्किंगमध्ये लावण्याचे आवाहन केले. सीएसएमटी स्थानक मोकळे करण्याच्या सूचना आंदोलकांना केल्या. तरीही सायंकाळी उशिरापर्यंत जनजीवन रूळावर आले नाही.
2 दिवसांत आरक्षण दिले नाहीतर
मी पाणीही सोडेन! जरागेंचा निर्धार
संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषद घेऊन जरांगे म्हणाले की, आंदोलनाला एक-एक दिवसाची परवानगी देण्याचा खेळ खेळू नका. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत मी मागे हटणार नाही आणि आंदोलन संपवणार नाही. आंदोलनाबाबत सरकार नाटक का खेळत आहे. सरकारने शौचालये, पाणी आणि खाद्यपदार्थांची दुकाने बंद केली. मराठ्यांनी कंटाळून मुंबई सोडून जावे असा यामागे डाव आहे. सरकार इंग्रजांपेक्षाही क्रूर झाले आहे, मराठ्यांच्या पोरांना अशी वागणूक देऊ नका, मुंबईत त्रास होईल, हे आम्हाला माहीत होते. आम्ही तयारीतच आलो होतो. मला जेलमध्ये टाकले आणि गोळ्या घातल्या तरी मात्र, शांततेतच आंदोलन करणार आहोत. येत्या दोन दिवसांत मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर मी पाणीही सोडणार आहे.