मान्याचीवाडी आदर्श गावात घरांच्या छपरावर ऊर्जानिर्मिती

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यामध्ये वसलेल्या मान्याचीवाडी या छोट्याशा आदर्श गावामध्ये राज्यातील पहिले सौरग्राम प्रकल्प उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.त्यामुळे आता या गावातील प्रत्येक घराच्या छपरावर सौर ऊर्जानिर्मिती होणार आहे.

मान्याचीवाडीचे सरपंच रवींद्र माने यांनी या विशेष उपक्रमाबाबत सांगितले की,घरांच्या छपरांवर तब्बल शंभर किलोवॉट वीजनिर्मिती केली जाणार आहे.या घरोघरी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला असून सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचे काम संपूर्ण गावात सुरू आहे.

टाटा सोलर पावर कंपनीच्या सन्मित्र सोलर एनर्जीच्या माध्यमातून सुमारे दहा तंत्रज्ञ आणि कर्मचारी या कामात गुंतले आहेत.मान्याची वाडीने स्वच्छतेपासून सुरू केलेला प्रवास आता अपारंपरिक ऊर्जा निर्मितीपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धनासह संतुलन राखण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.यामुळेच आतापर्यंत वसुंधरा अभियानामध्ये राज्य शासनाच्यावतीने या ग्रामपंचायतीचा दोनवेळा गौरवही करण्यात आला आहे.