मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्ग आता आठपदरी होणार

पुणे – मुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रकल्प एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला आहे.त्यानुसार हा एक्स्प्रेस महामार्ग आता सहाऐवजी आठपदरी करण्यात येणार आहे.

या महामार्गाच्या सुमारे ७० किलोमीटर लांबीच्या आठ पदरीकरणासाठी १०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. यासाठीचा प्रस्ताव मात्र शासन स्तरावर प्रलंबित आहे.या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर एक्स्प्रेस महामार्गाची क्षमता वाढणार आहे. पुणे- मुंबई एक्स्प्रेस महामार्गावरून दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे.या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये- जा करतात. सद्यस्थितीत हा महामार्ग सहापदरी आहे. महामार्गावर वाहनांची वाढती वर्दळ आणि आता अपुरा पडणारा मार्ग यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीने तयार केला आहे.खरे तर हा महामार्ग सुमारे ९४ किलोमीटर लांबीचा आहे.आता महामार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या दरम्यानचा १३.३ किलोमीटर पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत १.६७ किलोमीटर आणि ८.९२ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे असून या दोन्ही बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे, तर आशिया खंडातील सर्वांत मोठ्या दरी पुलाचे काम वेगाने सुरू आहे.खालापूर टोल ते खोपोली एक्‍झिटपर्यंत आठ पदरी रस्ता तयार करण्यात येत आहे.