मोदीच्या हस्ते तामिळनाडूतील नव्या पंबन पुलाचे आज उद्घाटन

चेन्नई -रामनवमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. दुपारी १२ वाजता नवीन पंबन रेल्वे पूलाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.४५ वाजता ते रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील. रामेश्वरम येथे दुपारी १.३० वाजता पंतप्रधान मोदी ८,३०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे आणि रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील.

पंबन पूल तामिळनाडूच्या मुख्य भूमीला रामेश्वरम बेटाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. २.८ किमी लांबीचा हा पूल सुमारे ५३५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे. देशात अशा प्रकारचा पहिलाच, तर जगातला दुसरा व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे. नव्या पंबन ब्रिजची उंची सध्याच्या पुलापेक्षा ३ मीटर अधिक असून, हा पूल समुद्रसपाटीपासून २२ मीटर उंचीवर आहे. या पुलामुळे रामेश्वरमची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होणार आहे. दक्षिण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोदींच्या दौऱ्याआधी या पुलाची आणि रामेश्वरम रेल्वे स्थानकाची पाहणी केली.