मुंबई- यंदा मुंबईकरांची उकाड्यापासून लवकरच सुटका होणार आहे. कारण मोसमी पाऊस नेहमीच्या वेळेच्या आधी म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे,
असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबईमध्ये दरवर्षी पाऊस हा १० जूननंतर सुरु होतो.पण यंदा ८ ते १२ जून दरम्यान पावसाळा सुरू होईल, असा ९२ टक्के अंदाज आहे. गेल्यावर्षी मोसमी पाऊस ९ जून रोजी मुंबईत दाखल झाला होता,तर २०२० मध्ये १४ जून रोजी पावसाचे आगमन झाले होते. पण यावर्षी मुंबईत लवकर पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला जात आहे.दरवर्षी नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास बंगालच्या उपसागरातून सुरू होतो आणि ते १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतात.त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत ५ जूनपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचतात. महाराष्ट्रात साधारणतः १० जूनपर्यंत मोसमी पावसाचे आगमन होते. मात्र,यंदा ही स्थिती बदलण्याची शक्यता आहे.