जयपूर- राजस्थानच्या पाली जिल्ह्यात काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात कोल्हापूरमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कुटुंब हे सोने-चांदीचा व्यवसाय करतात. हे कुटुंब शिवगंज येथील ज्वेलर्स मित्राकडे व्यवसायानिमित्त आले होते. शिवगंज येथून परतत असताना महामार्गावरील केनपुराजवळ त्यांची गाडी गुरांवर धडकली. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार उलटून ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. हा अपघात एवढा भीषण होता की, या कारमधील बाबुराव (५०), त्यांची पत्नी सारिका (३८), मुलगी साक्षी (१९) आणि मुलगा संस्कार(१७) या चौघांचा मृत्यू झाला. कार चालवत असलेले पुरेंद्र जैन यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना बांगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताच्या अर्ध्या तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत कारमध्ये अडकलेल्या बाबुराव, सारिका, साक्षी आणि संस्कार या चौघांचा मृत्यू झाला होता.
